बेळगाव : आज दिनांक 30-08-2024 रोजी सामाजिक भान ठेवत गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर श्रमदानातून येळ्ळूर रस्त्याचे डागडुजीकरण करण्यात आले.
गेल्या काही महिन्यांपासून येळ्ळूर रस्त्याची मोठे खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दुचाकीस्वारांना वाहन चालवणे आता खूपच कठीण झाले आहे. कारण रस्त्याची पातळी समतोल नसल्यामुळे या मार्गावरून वाहन नेताना दुचाकी अथवा रिक्षा किंवा चारचाचाकी वाहन एका बाजूला ओढल्यासारखे होते. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता उद्भवत असून गेल्या 2 आठवडाभरात या रस्त्यावर जीवघेणे अपघातही झाले. या मार्गावर कायमच वर्दळ असते. देसुर, खानापूर, नंदीहळ्ळी राजहंसगड येथील वाहतूकही याच मार्गाने मोठ्या प्रमाणत होत असते. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे खड्ड्यात पाणी साचल्याने अंदाज येत नाही. त्यामुळे देखील दुचाकी स्वारांचे अपघात होत आहेत. यासाठी यापूर्वी प्रशासनाकडे निवेदनही देण्यात आले आहे पण पावसामुळे या कामांना विलंब होत असल्याने या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच महत्त्वाचं म्हणजे गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर गावातून अनेक गणेश मूर्ती बाहेर जातात, बाहेरूनही मूर्ती गावात आणल्या जातात त्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये, संभाव्य धोका टळला जावा यासाठी सामजिक कार्याच्या भावनेतून एक जागरूक नागरीक म्हणून ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, परशराम परीट, रमेश मेनसे, उद्योजक एन. डी. पाटील, प्रसाद कानशिडे, मधू नांदुरकर, अनिल सांबरेकर, पृथ्वीराज पाटील, शुभम पठाणे, आदित्य हणमंत पाटील, अरुण मुरकुटे, मधू पाटील, आकाश मंगनाईक, बजरंग घाडी, दीपक कदम अशा युवा कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन स्वखर्चाने आणि श्रमदानातून प्रसंगावधान राहून रस्त्यांचे खड्डे बुजवून रस्त्यांचे डागडुजीकरण केले. तसेच यावेळी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनीही या स्तुत्य उपक्रमाला प्रतिसाद देत मदत केली त्यामुळे या सामजिक कार्यातून नागरिकांसाठी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभुमीवर वाहतूक सोयीस्कर झाली आहे.
यावेळी उपाध्यक्ष प्रमोद पाटील आणि माजी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी प्रशासनाला विनंती केली की, लवकरात लवकर येळ्ळूर रस्त्याचे दुपदरीकरण करून दोन्ही बाजूने वॉकिंग ट्रॅक करण्याच्या मागणीला प्रतिसाद देत कामाला सुरुवात करावी.