बेळगाव : बेळगाव इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (बिम्स)चे वैद्यकीय विद्यार्थी डॉ. शरणप्पा यांनी राज्यस्तरीय पी.जी. नीट परीक्षेत नववा क्रमांक मिळवून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे.
बिम्सचे एमबीबीएसचे विद्यार्थी असलेले डॉ. शरणप्पा शीनप्पन्नावर यांनी मिळविलेल्या यशामुळे बिम्सच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. बिम्स संस्था वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात स्वतःचे योगदान देत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. राज्यातील सर्वात मोठा जिल्हा बेळगाव वैद्यकीय शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती करत आहे. याची प्रचिती डॉ. शरणप्पा शीनप्पन्नावर यांनी मिळविलेल्या यशावरून येत आहे. डॉ. शरणप्पा शीनप्पन्नावर यांनी मिळविलेल्या यशाबद्दल बिम्सचे संचालक डॉ. अशोककुमार शेट्टी यांनी कौतुक केले असून डॉ. शरणप्पा यांच्या माध्यमातून बीम्सच्या यशाचा आरसा दर्शवत असल्याचे ते म्हणाले. डॉ. शरणप्पा, हे मूळचे गदग जिल्ह्यातील असून त्यांनी अभ्यासात कोणतीही तडजोड न करता ध्येय गाठण्याच्या दृढ निश्चयाने हे यश गाठले आहे. त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे सर्वच स्तरावर कौतुक होत आहे. एक कार्यक्षम डॉक्टर म्हणून संस्थेच्या उर्वरित विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श डॉक्टर म्हणून समाजाची सेवा डॉ. शरणप्पा करतील आणि एक चांगला डॉक्टर म्हणून समाजासाठी आपले सर्वोत्कृष्ट योगदान देखील देतील अशी अपेक्षा विजयालक्ष्मी दोडमणी यांनी व्यक्त केली आहे.