नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या जामीन प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी (दि. १३ सप्टेंबर) निर्णय दिला. दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहाराच्या सीबीआय तपास करत असलेल्या प्रकरणात केजरीवाल यांना १० लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. यामुळे केजरीवालांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याआधी त्यांना ईडी खटल्यातही जामीन मंजूर झाला होता.
दिल्ली मद्य धोरण गैरव्यवहार प्रकरणातील सीबीआयच्या खटल्यात जामीनासाठी केजरीवालांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने ५ सप्टेंबर रोजी निर्णय राखून ठेवला होता. त्यावर आज निकाल दिला.
या प्रकरणातील ईडीच्या खटल्यात अगोदर केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, या प्रकरणातच सीबीआयनेही खटला दाखल केल्याने केजरीवालांना तिहार तुरुंगात राहावे लागले. त्यांनी सीबीआयच्या अटकेला आव्हान दिले असून सीबीआय खटल्यात जामीन मिळावी, यासाठी दोन याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आहेत. या याचिकांवर ५ सप्टेंबर रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. त्यावर खंडपीठाने आज शुक्रवारी फैसला सुनावला.