निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मल्लिकार्जुन नगर जनता कॉलनीमध्ये सुमारे दीडशे पेक्षा अधिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. पण या ठिकाणी बस थांबा आणि निवाराचे नसल्याने विद्यार्थी आणि नागरिकांची गैरसोय आहे. तरी या ठिकाणी बस थांबा व निवारा शेड उभा करावे, या मागणीचे निवेदन मल्लिकार्जुन नगरातील नागरिकांनी रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार रत्न उत्तम पाटील यांना दिले.
निवेदनातील माहिती अशी, बेनाडीतील जनता कॉलनीत सुमारे ३० वर्षांपासून अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. शिवाय वर्षानुवर्षे येथील लोकसंख्या वाढत आहे. कॉलनीतील विद्यार्थी गावातील प्राथमिक शाळा, हायस्कूल, विद्यालय आणि निपाणीतील शाळेला ये-जा करतात. याशिवाय नोकरी व्यवसाय निमित्त अनेक नागरिकांना निपाणी ला जावे लागते. पण या ठिकाणी बस थांबा नसल्याचे कारण सांगून बस चालक वाहक न थांबताच निघून जातात. परिणामी विद्यार्थी आणि प्रवाशांना तासनतास थांबावे लागते.
या ठिकाणी निवारा शेड नसल्याने उन्हाळा आणि पावसाळ्यात विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे मल्लिकार्जुन नगरमध्ये बस थांब्यासह तात्काळ निवारा शेड उभारण्याची मागणी निवेदनात केली आहे.
रवी पाटील व नागरिकांच्या हस्ते याबाबतचे निवेदन देण्यात आले. उत्तम पाटील यांनी निवेदन स्वीकारून खासदार फंडातून या ठिकाणी बस निवारा शेड व बस थांबा करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आशिष शहा, बसगोंडा पाटील, मारुती लवटे, अनिल नागावे,ओंकार मधाळे, रामचंद्र वराळे, सुरज गिरगावे, अजित कळसन्नावर, आनंदा रवंदे, बाबुराव भोरे, अक्षय भोसले, पृथ्वीराज वराळे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.