
संजीवीनी फौंडेशनच्या इकोफ्रेंडली गणरायाचे विसर्जन
बेळगाव : सरकारने पीओपी विरोधी कायदे करून काही उपयोग होताना दिसत नसून कायदे फक्त कागदावरच असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे त्यामुळे आत्ता नागरिकांनीच आपली मानसिकता बदलून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढे येणे गरजेचे असल्याचे मत संजीवीनी फौंडेशनच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी व्यक्त केले.
संजीवीनी फौंडेशनच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केल्याबद्दल माहिती देताना त्या बोलत होत्या.
आदर्श नगर येथील संजीवीनी काळजी केंद्रात वर्षभर विविध सण मोठ्या उत्साहात साजरे करतात त्याचप्रमाणे गणेशोत्सव सुद्धा मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. दरवर्षी शाडूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते यावेळी रंगविरहीत मातीची श्रीमूर्ती बसविण्यात आली होती. तसेच कोणत्याही प्रकारच्या थर्मोकोल अथवा प्लॅस्टिकचा वापर न करता आरास करण्यात आली होती. गेले पाच दिवस दररोज सकाळी आणि संध्याकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गणेशाची आरती करण्यात आली. यामध्ये डॉ. राजेश लाटकर, डॉ. सुचेत्रा लाटकर, महांतेश पुराणिक, शिवाजीराव कदम, अरुण राबज्जनवर, मल्लिकार्जुन मुगळी, ऍड अमित कोकितकर, शितल कोकितकर, विद्या सरनोबत, विवेक सरनोबत, प्रियांका राठोड, प्रदीप गट्टी व इतरांचा समावेश होता.
पर्यावरणस्नेही गणेश विसर्जनासाठी महापालिकेने आवाहन जरी केलेले असले आणि विसर्जनासाठी ठिकठिकाणी फिरते कुंड जरी उभा केले असले तरी त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळताना दिसतो आहे पण संजीवीनी फौंडेशनच्या इकोफ्रेंडली गणरायाचे विसर्जन केंद्राच्या आवारात निर्माण केलेल्या कुंडात करून एक वेगळे उदाहरण साऱ्यांसमोर ठेवण्यात आले.
यावेळी काळजी केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने आरती करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत त्यांच्याच हस्ते गणेशाचे विसर्जन करण्यात आले.
यावेळी सीईओ मदन बामणे, संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ आणि इतर सदस्य उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta