बेळगाव : बेळगावात काल रात्री उशिरापर्यंत गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचण्यावरून झालेल्या भांडणात तीन तरुणांवर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे.
बेळगावातील चन्नम्मा सर्कलजवळ गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणांमध्ये डीजेच्या तालावर नाचताना किरकोळ भांडण झाले. या भांडणाचे रूपांतर हाणामारीत होऊन दर्शन पाटील, सतीश पुजारी व प्रवीण गुंड्यागोळ यांच्यावर चाकू हल्ला झाला. हल्ल्यात तीन तरुणांवर पोटात व छातीवर वार करण्यात आले असून आरोपी फरार झाले आहेत. जखमींना उपचारासाठी बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी हे समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहातील विद्यार्थी आहेत. शिवबसव नगरातील सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी होऊन पहाटे साडेतीनच्या सुमारास क्लब रोडने परतत असताना काही तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी विश्वेश्वरय्या नगरमध्ये काहींना ताब्यात घेतले आहे.
गणेश मिरवणुकीत वैयक्तिक वादातून ही घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. एपीएमसी पोलीस अजून काही जणांच्या शोधात आहेत. ही घटना वैयक्तिक असून अफवांवर लक्ष न देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. एपीएमसी स्टेशन पोलिसांनी बेळगाव जिल्हा रुग्णालयात भेट देऊन घटनेची माहिती घेतली.