निपाणी (वार्ता) : गदग जिल्ह्यात हरभऱ्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात आले आहे. पण एका कंपनीतील दोघांनी अनेक शेतकऱ्याकडून सात कोटी रुपयांचा हरभरा खरेदी केला होता. पण नऊ महिने होऊनही रक्कम न दिल्याने कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पुढाकाराने संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुन्नापा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली गदग जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून एक महिन्याच्या आत शेतकऱ्याचे रक्कम वसूल करून देण्याचे आश्वासन दिले त्यामुळे संघटनेने आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
हरभरा विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी रकमेसाठी लोकप्रतिनिधी, मंत्री महोदय अधिकाऱ्यांना तक्रारीचे निवेदन दिले होते. पण त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे संबंधित कंपनी आणि तेथील दोघेजण मोकाटच होते. अखेर रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी क्रांतिवीर संगोळी रायान्ना, कित्तूर चन्नम्मा चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. तर राजू पोवार यांनी एक महिन्याच्या आत शेतकऱ्यांना रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यावेळी महेश सुभेदार, शरणाप्पा मरळी, संगमेश सागर, प्रकाश नाईक, सुरेश प्रज्ञानावर यांच्यासह शेतकरी आणि रयत संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.