बेळगाव : येथील श्री सुवर्णलक्ष्मी को-ऑप. क्रेडिट सोसायटीला गेल्या आर्थिक वर्षात 46 लाख 6 हजार रुपयाचा निव्वळ नफा झाला असून या सोसायटीकडे 20 कोटी 62 लाख रुपयाच्या ठेवी आहेत. तर सोसायटीने आपल्या सभासदांना 17 कोटी 66 लाख रुपयाच्या कर्जाचे वाटप केले आहे, अशी माहिती सोसायटीचे चेअरमन श्री. विठ्ठल शिरोडकर यांनी बोलताना दिली.
संस्थेची सत्ताविसावी वार्षिक सर्वसाधारण सभा गेल्या मंगळवारी संस्थेच्या कार्यालयात संपन्न झाली. या प्रसंगी श्री. विठ्ठल शिरोडकर हे अध्यक्षस्थानी होते तर निवृत्त तहसीलदार आणि सोसायटीचे ज्येष्ठ सभासद अनिल नारायण कारेकर, संस्थापक मोहन कारेकर व व्हा. चेअरमन विजय सांबरेकर आदी व्यासपीठावर होते.
संस्थेचे सचिव अभय हळदनकर यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यावर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. चेअरमन यांनी पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. मागील वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत अभय हळदणकर यांनी मांडला तर संस्थेचे अकाउंटंट प्रदीप किल्लेकर यांनी नफा -तोटा पत्रक व ताळेबंद पत्रकाचे वाचन केले तसेच आगामी वर्षाचे अंदाजपत्रकही सादर केले. या सर्व बाबींना उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गुजरात मंजुरी दिल्यानंतर गेल्या वर्षभरातील कार्याचा आढावा विठ्ठल शिरोडकर यांनी घेतला. सोसायटीचे भाग भांडवल 23 लाख 40 हजार असून 5 कोटी 85 लाखाची गुंतवणूक करण्यात आली आहे तसेच सभासदांना 18 टक्के लाभांश देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
प्रमुख पाहुणे अनिल कारेकर यांनी सुवर्ण लक्ष्मीच्या यशस्वी वाटचालीबद्दल समाधान व्यक्त केले. आणि “ही संस्था सभासदांच्या आर्थिक उन्नती बरोबरच सामाजिक उपक्रम राबवित आहे हे अतिशय कौतुकास्पद आहे” असे मत व्यक्त केले .
यावेळी सभासद अशोक हलगेकर, मोहन कारेकर व विजय सांबरेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी संचालक विनायक कारेकर, प्रकाश वेर्णेकर, दीपक शिरोडकर, समर्थ कारेकर, राजू बांदीवडेकर, माणिक सांबरेकर, सौ. मधुरा शिरोडकर, विराज सांबरेकर, सुरेश पाटील या संचालकाबरोबरच अनेक मान्यवर सभासद उपस्थित होते. सूत्रसंचालन अभय हळदणकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रदीप किल्लेकर यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta