बेळगाव : मुडा घोटाळ्यात अडकलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, जर राजीनामा दिला नाही तर निजद तीव्र लढा देत राहील, असा इशारा निजदचे शंकर माडलगी यांनी दिला.
उच्च न्यायालय आणि लोकप्रतिनिधी न्यायालयाच्या आदेशानंतर मुडा घोटाळ्यात अडकलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा यासाठी बेळगाव येथील चन्नम्मा सर्कल येथे निजदचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले.
यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. निजदचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी बोलताना म्हणाले की, नैतिकतेची शिकवण देणाऱ्या सिद्धरामय्या यांनी आता नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुडा येथील जागा बळकावण्यासाठी सत्तेचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत न्यायालयाचे आदेशही स्पष्ट आहेत. आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून नैतिक मूल्यांना पायदळी तुडवले आहे. त्यामुळे क्षणभर सत्तेत न राहता राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
निजदचे जिल्हाध्यक्ष शंकर माडलगी, मारुती अष्टगी आणि शेकडो निजद कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.