बेळगाव : खासदार जगदीश शेट्टर यांनी मंगळवारी शहरातील विविध रेल्वे उड्डाणपुलांच्या बांधकामासंदर्भात अधिकाऱ्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. त्यांनी त्या ठिकाणी भेट देऊन रेल्वे विभागाचे अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करून आगामी काळात टिळकवाडीतील पहिले व दुसरे रेल्वे गेट तसेच तानाजी गल्ली येथील रेल्वे गेट येथे उड्डाणपूल उभारणी संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
तिसरे रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाच्या संदर्भातील सध्याच्या त्रुटी दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने काम सुरू करावे, अशी सूचना खासदारांनी केली.
रेल्वे विभागाच्या अभियंत्यांना आणि महानगरपालिकेच्या अभियंत्यांना रेल्वेच्या टिळकवाडी पहिले गेट आणि दुसरे गेट जवळ नव्याने बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या संदर्भात आवश्यक कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले.
बेळगाव शहरातील तानाजी गल्ली येथील उड्डाणपुलाबाबत रहिवाशांची मते जाणून घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आ. अभय पाटील, महापौर सविता कांबळे, उपमहापौर आनंद चव्हाण, माजी आ. अनिल बेनके, नगरसेविका वाणी जोशी, राजू भातकांडे, विनोद भागवत, रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.