बेळगाव : बेळगाव माळमारुती पोलीस स्टेशनने मोठी कारवाई करून महाराष्ट्रातील सांगली ते हुबळी येथे मालवाहू वाहनातून अवैधरित्या वाहतूक केलेली २.७३ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली. मालवाहू वाहन जप्त करण्यात आले असून दोन आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. सचिन मेनकुदळे, सांगली, महाराष्ट्र आणि मारुती मरगुडे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
बेळगावचे पोलीस आयुक्त व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदीश्वर कुंभार यांच्या पथकाने सांगलीहून हुबळीकडे जाणाऱ्या अशोक लेलँड गुड्स वाहनाला थांबवून तपासणी केली असता, योग्य कागदपत्रांशिवाय कोट्यवधी रुपयांची अवैध वाहतूक होत असल्याचे आढळून आले.
वाहनातील दोघांना तात्काळ ताब्यात घेऊन २,७३,२७,५०० रुपये रोख जप्त करण्यात आले. अवैध पैशांची वाहतूक करण्यासाठी मालवाहू वाहनाच्या केबिनमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. याप्रकरणी माळमारुती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.