बेळगाव : कळसा भांडुरी नाला जोडणी प्रकल्पासंदर्भात काल कळसा भांडुरी नाला जोडणी महिला आंदोलनात महिला संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती त्रिवेणी पटाथ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी रोशन मोहम्मद यांना शुक्रवारी निवेदन दिले होते. या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी कळसा भांडुरी आंदोलनाच्या महिला गटाने केलेली होती. हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविलेले आहे.
अशाच प्रकारचे निवेदन महिला संघटनेच्या वतीने धारवाड हुबळी, बागलकोट, गदग या जिल्हाधिकाऱ्यानाही देण्यात येणार असल्याचे श्रीमती त्रिवेणी पटाथ यांनी सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नंतर दुसऱ्या फेरीमध्ये आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची तसेच कर्नाटकच्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही हे निवेदन देऊन कळसा भांडुरी प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी विनंती करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर श्रीमती त्रिवेणी पटाथ यांनी सांगितले की, आंदोलनाच्या दुसऱ्या भागात आम्ही केंद्रीय मंत्र्यांना दिल्लीत जाऊनही निवेदने देऊन आम्हा नागरिकांची मागणी ही पिण्याच्या पाण्यासाठी असून उत्तर कर्नाटकातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या असल्याचेही आम्ही पटवून देणार आहोत आणि यासाठी हा प्रकल्प लवकर पूर्ण करावा अशी विनंती करणार आहोत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही आम्ही कळसा भांडुरी नाल्यातील पाणी उत्तर कर्नाटकातील नागरिकांना पिण्याचे पाणी कमी असल्यामुळे या पाण्याची जरुरी असल्याचे सांगणार आहोत आणि आमच्या या प्रकल्पाला आपण विरोध करू नये अशी मागणीही आम्ही करणार आहोत.
वन खात्यातर्फे या भागात या प्रकल्पाचे काम केल्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडे नष्ट होतील असे म्हटले जात आहे. पण नाला जमिनीखालून असल्यामुळे नाल्याचे काम झाल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा झाडे सहजपणे लावता येतील असेही सांगण्यात येणार आहे. हे आंदोलन आम्ही कळसा भांडुरा नाल्याची जोडणी होईपर्यंत सुरू ठेवणार असल्याचे श्रीमती त्रिवेणी पटाथ यांनी सांगितले आहे.