बेळगाव : १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळ्या दिनासाठी कोणत्याही कारणास्तव परवानगी देऊ नये अशी मागणी करत कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने आज निदर्शने करण्यात आली.
आज बेळगाव पोलीस आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करत कन्नड संघटनांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात घोषणाबाजी केली. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने १ नोव्हेंबर रोजी पाळण्यात येणाऱ्या काळा दिवसाला परवानगी देऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. १ नोव्हेंबरला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काळ्या दिनाच्या नावाखाली महाराष्ट्रातील राजकारण्यांना बेळगावला बोलावून येथील राजकीय व्यक्ती आणि अधिकाऱ्यांचा अवमान केला जातो. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि पोलिस आयुक्तांनी कोणत्याही कारणास्तव काळ्या दिवसाला परवानगी देऊ नये. प्रत्येक वेळी परवानगी देत नाही असे सांगून आदल्या दिवशी परवानगी दिली जाते. पोलिस बंदोबस्तात कार्यक्रमाची व्यवस्था केली जाते. मनपामध्ये समितीचे नगरसेवक आणि आमदारही नाहीत. समितीने आपले अस्तित्व गमावले असून आता मराठी आणि कन्नड भाषिक सौहार्दतेत राहात आहेत. यामुळे कोणत्याही कारणास्तव काळा दिन पाळण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी करवे प्रमुख दीपक गुडघेनट्टी यांनी केली. याबाबतचे निवेदन करवेच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डी.सी.पी. रोहन जगदीश यांच्याकडे सादर करण्यात आले.