बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज फिल्डवर उतरून कर वसुली मोहिमेला सुरुवात केली. शहरातील बाजारपेठ परिसरात करवसुली मोहीम राबवत प्रचंड कर थकबाकी असलेल्या दुकानांना टाळे ठोकून जप्तीची कारवाई करण्यात आली.
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि आयुक्तांच्या निर्देशानुसार बेळगाव महापालिकेनेही करवसुली मोहीम सुरू केली आहे. बेळगावच्या जनतेने थकीत कर लवकर भरून सहकार्य करावे. १०० टक्क्यांपैकी ६२ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. आठवडाभरात कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर कारवाई केली जाईल. महापालिकेनेपथके तयार केली असून शहरात कर वसुली मोहीम राबविली जात आहे. महापालिकेच्या महसूल विभागाच्या उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी सांगितले की, शहरातील मारुती गल्लीतील कामत हॉटेलवर आज जप्तीची कारवाई करण्यात आली असून ११ लाख रुपये कर थकीत असल्याचे त्या म्हणाल्या. महसूल अधिकारी अन्नीशेट्टर, सहायक महसूल अधिकारी अनुराधा आदींच्या पथकाने बेळगावातील बाजारपेठ परिसरात कर वसुली मोहीम राबवली.