खानापूर तालुका युवा समितीतर्फे निवेदन सादर
बेळगाव (वार्ता) : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ९ ऑगस्ट क्रांती दिनी दीर्घकाळ अनिर्णित राहिलेला सीमाप्रश्न केंद्र सरकारने त्वरित सोडवावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सीमाभागातून अकरा हजार पत्रे पाठवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या उपक्रमाला बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाने पाठिंबा दिला, तसेच तो यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार सहकार्य करतील, अशी ग्वाही देण्यात आली.
युवा समितीच्या पदाधिकार्यांनी शुक्रवारी पत्रकार संघाला भेट देऊन आपली भूमिका मांडली. खानापूर युवा समितीच्या या उपक्रमास पत्रकारांनी व्यापक प्रसिद्धी देऊन तो यशस्वी करावा, असे आवाहन खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले.
पत्रकार संघाचे कार्यवाह शेखर पाटील यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी पत्रकार संघाने सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.
आसाम व मिझोराम यांच्यातील सीमावाद उफाळून आला आहे. मिझोरामच्या पोलिसांनी केलेल्या गोळीबारात आसामचे सहा पोलिस ठार झाले. त्याची प्रतिक्रिया संसदेत उमटली व प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्याला उत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी आसाम-मिझोराम सीमावादाप्रमाणेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अस्तित्वात आहे याची कबुली दिली. अशावेळी खानापूर युवा समितीने पंतप्रधानांना पत्र पाठविण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. मराठी जनतेने तो यशस्वी करावा, असे त्यांनी सांगितले.
यावेळी खानापूर युवा समितीचे सचिव सदानंद पाटील, किशोर हेब्बाळकर, भूपाल पाटील उपस्थित होते.
कार्यकारिणीचे ज्येष्ठ सदस्य व पत्रकार परिषदेचे प्रतिनिधी सुहास हुद्दार यांनी आभार मानले.
Check Also
बेळगावात सी. टी. रवींच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन; पुतळा जाळला
Spread the love बेळगाव : महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य …