बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयात आत्महत्या केलेल्या एसडीए कर्मचारी रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या प्रकरणात अनेक खुलासे पुढे आले असून निनावी पत्र आणि व्हॉट्सअॅप मेसेजमुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एसडीए कर्मचारी रुद्रण्णा यडवण्णावर यांच्या आत्महत्येप्रकरणी तहसीलदार बसवराज नागराळ आणि चालक अशोक कब्बलिगेर यांची सखोल चौकशी सुरू आहे. या प्रकरणात निनावी पत्रातून मिळालेल्या माहितीनुसार ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय वर्तविण्यात आला आहे. अनामिक पत्र पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी, प्रादेशिक आयुक्त, राज्यपाल आणि मानवाधिकार आयोगाला पाठवले गेले असून, त्यात तहसीलदार वाहन चालकावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.तपासादरम्यान, रुद्रण्णा यांनी व्हॉट्सअॅप ग्रुपवर माझ्या मृत्यूसाठी तहसीलदार बसवराज, सोमु आणि अशोक जबाबदार आहेत, असा मेसेज पाठवला होता. मात्र, नागराज यांनी तो मेसेज डिलीट केल्याचा तपासात उघड झाले आहे.चौकशीदरम्यान एसीपी शेखरप्पा यांनी विचारले की, रुद्रण्णा आत्महत्या करण्यापूर्वी मेसेज पाठवत असताना, तहसीलदारांनी त्यांना का थांबवले नाही किंवा शांत करण्याचा प्रयत्न का केला नाही? तहसीलदार बसवराज नागराळ यांचे वाहन चालक म्हणून काम करणारे अशोक कब्बलिगेर हे मूळतः बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी या गावात ग्राम सहायक म्हणून कार्यरत असल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील 15 वर्षांपासून ग्राम सहायकाचा पगार घेऊन ते तहसीलदार कार्यालयात वाहन चालकाची भूमिका कशी निभावत आहेत, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.बडाल अंकलगी गावातील ग्रामस्थांनी या प्रकरणाचा तीव्र निषेध केला असून, संबंधितांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाने तहसीलदार कार्यालयातील कारभारावर गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta