बेळगांव : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस.एम कृष्णा यांच्या निधनानिमित्त आज कर्नाटक राज्यात सुट्टी जाहीर केल्यामुळे बेळगावातील हिवाळी अधिवेशनाचे काम आज होणार नाही. दरम्यान, अधिवेशनाला आलेल्या अनेक आमदार व मंत्र्यांनी विविध ठिकाणी आपल्या कामाचे नियोजन केले. कर्नाटकचे माजी मंत्री सुनील कुमार, माजी मंत्री प्रभू चव्हाण यांच्यासह काही आमदार आणि माजी मंत्री आज कोल्हापूर येथील अंबाबाई दर्शनाला गेले होते.
कर्नाटकचे मंत्री आणि आमदार अंबाबाई दर्शनाला आल्याची माहिती मिळतात. शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते अंबाबाई परिसरात गोळा झाले. त्यांनी यावेळी दर्शनासाठी आलेल्या कर्नाटकच्या माजी मंत्री आणि आमदारांना बेळगाव सीमा भागात मराठी भाषिकांवर होत असलेल्या अत्याचाराचा जाब विचारला. यावेळी कोल्हापूरातील शिवसैनिकांच्या, बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांबाबत असलेल्या तीव्र भावना पाहून दर्शनासाठी आलेल्या माजी मंत्री आणि आमदारांनी कशीबशी वेळ मारून नेली.