Sunday , September 8 2024
Breaking News

पाणी समस्या उद्भवल्यास बांधून घालेन : आ. अभय पाटील यांचा एल अँड टी अधिकार्‍यांना इशारा

Spread the love

बेळगाव : बेळगाव शहरात कुठे जरी पाण्याची समस्या उद्भवली तर तुम्हाला बांधून घालून, ब्लॅक लिस्टमध्ये घालेन असा इशारा आ. अभय पाटील यांनी एल अँड टी कंपनीच्या अधिकार्‍यांना दिला.
बेळगाव महानगर पालिकेने शहराच्या पाणी पुरवठ्याची जबाबदारी एल अँड टी कंपनीला दिली आहे. मात्र त्या दिवसापासून शहरात पाण्याची समस्या वरचेवर निर्माण होत आहे. जलवाहिनीला गळती लागण्याचे प्रकार तर वारंवार घडत आहेत. याबाबत तक्रार देऊनही एल अँड टी कंपनी बेजबाबदारपणा दाखवत दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे आ. अभय पाटील यांनी सोमवारी महापालिका सभागृहात बैठक घेऊन एल अँड टी कंपनीच्या अधिकार्‍यांचा क्लास घेतला.
ते म्हणाले, मी कालच बेळगाव दक्षिण मतदारसंघात अनेक ठिकाणी भेट दिली. त्यावेळी एल अँड टी कंपनीबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गळती लागूनही तुम्ही त्याची दुरुस्ती का केली नाही असा सवाल त्यांनी केला. नागरिकांनी, नगरसेवकांनी फोन करूनही तुम्ही त्याला प्रतिसाद का देत नाही? पाईपलाईन घालण्यासाठी खोदलेले खड्डे तसेच सोडून देता, त्याशिवाय 24द7 पाणी पुरवठ्याच्या प्रदेशातही नियमित पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत असे सांगून आ. पाटील यांनी अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. एल अँड टी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी बेळगावला का येत नाहीत? असा प्रश्न करून अशाच प्रकारे तुम्ही बेजबाबदारपणे काम करणार असाल तर वरिष्ठ अधिकार्‍यांसह कनिष्ठ अधिकार्‍यांनाही खोलीत कोंडून ठेवावे लागेल. त्याशिवाय कंपनीला ब्लॅक लिस्टमध्ये घालावे लागेल असा इशारा आ. अभय पाटील यांनी दिला.
याबाबत किती नुकसान झाले याचा महापालिका आयुक्तांनी एक अहवाल तयार करावा, त्याची भरपाई एल अँड टी कंपनीकडून वसूल करावी अशी सूचना आ. अभय पाटील यांनी दिली. यावेळी मनपा आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, स्मार्टसिटी प्रकल्पाचे एमडी प्रवीण बागेवाडी, बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

ईद-ए-मिलाद २२ सप्टेंबर रोजी साजरा करणार; मुस्लिम बांधवांचा निर्णय

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव काळातच होणार असलेला ईद-ए-मिलाद हा सण पुढे ढकलण्याचा निर्णय …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *