येळ्ळूर : येळ्ळूर सुळगापासून ते देसूर राजहंसगड कॉर्नर पर्यंतच्या रस्त्याची पार दुरावस्था झाली होती, याची दखल घेत या भागाच्या आमदार तसेच महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या तीन किलोमीटर पर्यंतच्या रस्त्याचे खडीकरण करून त्यावर डांबरीकरण करण्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी त्यांनी मंजूर केला होता. त्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. मृणाल हेब्बाळकर यांनी कुदळ मारून या रस्त्याच्या कामाला चालना दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुळगा ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अरविंद पाटील हे होते. यावेळी बोलताना मृणाल हेब्बाळकर म्हणाले, सुळगा गावा पासून ते देसुर क्रॉस पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली होती त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती, रस्त्याच्या मधोमध अनेक मोठमोठे खड्डे पडल्यामुळे अनेक लहान मोठे अपघातही होत होते. याची दखल घेऊन या भागाच्या आमदार तसेच महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या रस्त्याच्या कामासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला असून, रस्त्याचे काम आता व्यवस्थित होणार आहे. रस्त्याचे काम व्यवस्थित होत आहे की नाही याची पाहणी सुद्धा गावकऱ्यांनी करावी व गावातील इतर काही समस्या असल्यास त्या आमच्या निदर्शनास आणाव्यात सर्व समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अरविंद पाटील यांनीही महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या कार्याचे कौतुक केले. व रस्त्यासाठी निधी मंजूर करून कामाला सुरुवात केल्यामुळे आभारही मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पी जी पाटील यांनी केले. याप्रसंगी माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णू लोहार, प्रभाकर नावगेकर, अरुण पाटील, पी एन पाटील, एम आय पाटील, रवी हाजगोळकर, पी जी पाटील, महेश बस्तवाडकर, यल्लाप्पा कणबरकर, संदीप जाधव, अक्षय पाटील, राजू मोगरे यांच्यासह ग्रामपंचायत पीडीओ व कर्मचारी, अंगणवाडी महिला कर्मचारी, भावकेश्वरी व नेताजी हायस्कूलचे शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी पी. जी पाटील यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta