बेळगाव : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी शिनोळी येथे महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्याला बेळगावच्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडून संपूर्ण पाठिंबा असल्याचे समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आणि खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी स्पष्ट केले आहे.
कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे (उ.बा.ठा.) नेते विजय देवणे यांनी एका पत्राद्वारे शिवसेनेतर्फे बेळगाव सीमेवर महाराष्ट्र हद्दीत मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचे आवाहन केले होते. या संदर्भात अष्टेकर आणि मरगाळे यांनी उपरोक्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कोल्हापूर येथील शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी सीमावासीय मराठी बांधवांसाठी लवकरात लवकर एका मेळाव्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला असून या मेळाव्याच्या आयोजनाचे निमंत्रण त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला दिले आहे. त्यांच्या या निमंत्रण पत्रावरून महाराष्ट्रातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सीमावासियांसाठी हिरिरीने काम करत आहे हे स्पष्ट होते आणि यासाठी त्यांना शतशः धन्यवाद. मराठी भाषिकांचा महामेळावा पुन्हा आयोजित करण्याचा निर्णय त्यांनी घेतला याचे आम्ही स्वागत करतो. महामेळाव्याच्या आयोजनासाठी त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडे परवानगी मागितली आहे, खरं तर आमच्या परवानगीची काहीच गरज नाही. कारण अशा मेळाव्यांमध्ये बहुसंख्येने सहभागी होणे हे सीमा भागातील मराठी भाषिकांचे कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य म. ए. समितीचे नेते आणि कार्यकर्ते आजतागायत निभावत आले आहेत. शिनोळी येथे जो मराठी भाषिकांचा महामेळावा भरवणार आहेत. त्या मेळाव्याला विरोध करण्याचे काहीच कारण नाही. या महामेळाव्यामध्ये बेळगावसह सीमा भागातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे अशी मी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे नम्र विनंती करतो. त्याचप्रमाणे सदर महामेळावा यशस्वी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन आम्ही विजय देवणे यांना दिले आहे. त्यांनी कोठेही सीमा भागातील मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करावा त्याला आम्ही संपूर्ण पाठिंबा व्यक्त करून मिळावा यशस्वी करू अशी ग्वाही समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांनी दिली.
समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले की, कोल्हापूर येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रमुख विजय देवणे यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीकडे पत्र पाठवून शिवसेनेतर्फे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तेंव्हा महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, काँग्रेस पक्ष किंवा इतर कोणीही आम्हा सीमावासियांसाठी मेळावा भरवू देत त्या मेळाव्याला हजेरी लावणे आमचे कर्तव्य आहे.
Belgaum Varta Belgaum Varta