बेळगाव : महाराष्ट्रातील नेते बेळगावला केंद्रशासित करण्याची मागणी सातत्याने करत असतात. या उलट बेळगाव सीमा भागाचा मुंबईवर हक्क आहे. त्यामुळे मुंबईला केंद्रशासित करण्यात यावे, अशी मुक्ताफळे आमदार लक्ष्मण सवदी यांनी आज विधानसभेत उधळली.
उत्तर कर्नाटक विकास विषयावरील चर्चेत भाग घेताना आमदार सवदी म्हणाले, बेळगाव सीमा भागातील लोकप्रतिनिधींनी त्याकाळी मुंबई विधानसभेत लोकप्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे आमचा मुंबईवर हक्क आहे. असे असताना, महाराष्ट्रातील मति हीन नेते बेळगाव केंद्रशासित करण्याची मागणी करत असतात. याला प्रत्युत्तर देण्यासाठी कर्नाटक सरकारने मुंबईला केंद्रशासित करावे, अशी मागणी त्यांनी विधानसभेत बोलताना केली
दरम्यान बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, दुसऱ्या बाजूला नागपूर येथे महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. आमदार लक्ष्मण सवदी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात उमटण्याची दाट शक्यता आहे.