येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विश्व विद्यालयातील साहित्यिक व लेखक डॉ. शरद बाविस्कर हे असणार आहेत. संमेलन पाच सत्रात होणार आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथ दिंडीने होणार असून, पहिल्या सत्रात उद्घाटन व अध्यक्षीय भाषण होणार आहे. तर दुसऱ्या सूत्रात पुण्याचे साहित्यिक दत्ता देसाई हे “आपली संस्कृती, आपला विकास” यावर आपले विचार मांडणार आहेत. तर तिसऱ्या सत्रात शैक्षणिक पुरस्कार वितरण. याचबरोबर “एक तास बसा… मनसोक्त हसा” विनोदी कार्यक्रम लोकशाहीर प्रा. रणजीत कांबळे हे सादर करणार आहेत. तर चौथ्या सत्रात ‘जागर लोककलेचा’ हा जुगलबंदी भारुड, विनोदी कार्यक्रम संदीप मोहिते व आबा चव्हाण सादर करणार आहेत. तर पाचव्या सूत्रात मुंबई येथील प्रसिद्ध अभिनेत्याचे मनोगत ऐकायला मिळणार आहे. डॉ. शरद बाविस्कर हे धुळे जिल्ह्यातील रावेर येथील कोरडवाहू शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेले आणि संघर्षातून यश संपादन करणारे व्यक्तिमत्त्व आहेत. दहावीत इंग्रजी विषयात नापास झाल्यानंतरही सात भाषांवर प्रभुत्व मिळवून त्यांनी पाच मास्टर्स डिग्र्या प्राप्त केल्या आणि फ्रेंच तत्त्वज्ञानात पीएचडी पूर्ण केली. सध्या ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू), दिल्ली येथे फ्रेंच आणि फ्रँकोफोन स्टडीजचे प्राध्यापक आहेत.
त्यांचे आत्मकथन “भुरा” मराठी साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरले आहे. भाषाशास्त्र, सामाजिक भाषाशास्त्र, फ्रेंच साहित्य, संस्कृती अध्ययन आणि तत्त्वज्ञान हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत. त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासात सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करत युरोपमधील तीन देशांत उच्च शिक्षण घेतले. त्यांच्या प्रवासाने शैक्षणिक यशासाठी प्रखर जिद्दीचे उदाहरण निर्माण केले आहे. संमेलनाची तयारी जोमात सुरू आहे. संमेलनाला साहित्य रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे, कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल, सचिव डॉ. तानाजी पावले यांनी केले आहे.