बेळगाव : युवा दिन साजरा करणे हे आजच्या तरुणांना प्रोत्साहन देण्याचे कार्य आहे. कोणत्याही संघटनेत व समाजामध्ये एक चांगले कार्य करायचं असेल ते युवकांचा सहभाग हा असला पाहिजे. आणि एक चांगल्या विचारांचे युवक समाजामध्ये कार्य करत असतील तर त्या समाजाचा सर्वांगीण विकास होत असतो, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने गेल्या अनेक वर्षापासून स्वामी विवेकानंद जयंती व पुण्यश्लोक जिजामाता जयंती दिवशी युवा दिन साजरा करून युवकांना प्रेरणा देण्याचे कार्य करत आहे. येणाऱ्या 12 जानेवारीला महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीच्या वतीने युवा दिन साजरा करण्यासाठी आम्ही युवा आघाडीला पाठिंबा देत आहे, असे उद्गार बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयात रविवार दिनांक २९ रोजी युवा दिन संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनोहर किणेकर होते.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किनयेकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी रामचंद्र मोदगेकर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र एकीकरण समिती हा युवा दिन साजरा करत आहे, आणि समितीच्या प्रत्येक कार्यात युवक हे मोठ्या प्रमाणात असतात. यासाठी स्वामी विवेकानंदांचे व पुन्यश्लोक जिजामातांचे संस्कार तरुणांमध्ये रुजवावेत व आमचा तरुण सुसंस्कृत होऊन अन्याय, अत्याचार च्या विरोधात लढला पाहिजे यासाठी या युवा दिनाची आज गरज आहे. गेल्या ६८ वर्षापासून सीमाभागातील मराठी माणसावर जो अन्याय होत आहे, तो अन्याय दूर करण्यासाठी या संस्काराची गरज तरुणांमध्ये निर्माण व्हावी यासाठी आम्ही हा युवा दिन साजरा करत आहोत. येणाऱ्या युवा दिन ही आपण मोठ्या उत्साहात साजरा करून बेळगाव तालुक्यातील समस्त युवा वर्गाने या युवादिनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे म्हणाले.
यावेळी युवा नेते आर. एम. चौगुले, लक्ष्मण होनगेकर आदींनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी सचिव ऍड. एम. जी. पाटील, लक्ष्मण होनगेकर, युवा नेते आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, लक्ष्मण पाटील, विठ्ठल पाटील, मनोहर संताजी, विठ्ठल पाटील, मनोहर हुंदरे, राजू किनयेकर, शंकर कोनेरी, सोमनाथ पाटील, डी. बी. पाटील, पियुश हावळ, आदि कार्यकर्ते उपस्थित होते.