
बेळगाव : आनंदनगर येथील नाला वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. नागरिकांना विश्वासात न घेता स्थानिक लोक्रतिनिधींनी तसेच पालिका प्रशासनाने आनंदनगर वडगांव येथील नाल्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी येथील नागरिकांच्या घरावर आरेखन देखील करण्यात आले असून काही जणांच्या घरावर आणि संरक्षण भिंतीवर हातोडा देखील पडला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी नाल्याचे काम बंद पाडले. याची माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना समजताच पालकमंत्र्यांनी स्वतः नाल्याची पाहणी केली आणि नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले व सदर नाला अस्तित्वातच नसेल तर तो निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. नाल्याचे बांधकाम तात्काळ थांबवा, असा आदेश जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

आनंदनगर वडगाव येथील नाल्यासंदर्भात माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी तात्काळ आनंदनगर येथे भेट देऊन नाल्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत महानगरपालिका पाटबंधारे खात्याचे अधिकारी उपस्थित होते. आनंदनगर दुसरा क्रॉस येथील नाला बांधकामाच्या पाहणीसाठी आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान पालकमंत्र्यांनी भेट दिली. यावेळी दुसऱ्या क्रॉस मधील नागरिकांनी आपल्या तक्रारी पालकमंत्र्यांसमोर मांडल्या. सातबारा उतारा, कॉमन पिठीशीट, अनगोळ ग्रामीण नकाशा व बुडा लेआउट प्लॅन या सर्व कागदपत्रांमध्ये कोठेही नाला अस्तित्वात असल्याचा उल्लेख नाही. मात्र स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला हाताशी धरून सदर नाला निर्मिती करण्याचा घाट घातला आहे. स्थानिक नागरिकांच्या खाजगी मालमत्तेचे नुकसान देखील करण्यात आले आहे. अस्तित्वात नसलेल्या नाल्याची निर्मिती न करता पाऊस आणि सांडपाण्याच्या निचऱ्याची समस्या निकालात काढण्यासाठी वेगळा पर्याय अवलंब व्हावा, अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी यावेळी केली.
नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना नाल्यासंदर्भात जाब विचारताच सर्व अधिकारी निरुत्तर झाले.
यावेळी संतोष पवार, उमेश पाटील, सुनील दंडकल, प्रमोद पोतदार, नारायण जुवेकर, परशराम जुवेकर, राम जुवेकर, महेश सुभेदार, किरण काकतीकर, परशराम खन्नूकर, नारायण नायकोजी, डी. एम. पाटील, अनिल गोकाक, श्याम जुवेकर, महेश मोहिते, बाळू जुवेकर, शिवानी पाटील, प्रतिमा पवार यांच्यासह बहुसंख्य महिला उपस्थित होत्या

Belgaum Varta Belgaum Varta