
बेळगाव : 176 वर्षाची परंपरा असलेल्या येथील सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री. अनंत चांगाप्पा लाड यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विनोद गायकवाड, कार्यवाहपदी सौ. सुनीता मोहिते व सहकार्यवाहपदी श्री. अनंत जांगळे यांची निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष माजी महापौर गोविंदराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी संपन्न झालेल्या बैठकीत ज्येष्ठ सदस्य श्री. अभय याळगी यांनी पॅनलची नावे सुचविली. त्याला सदस्य प्रसन्ना हेरेकर यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करणारी सर्वश्री नेताजी जाधव व रघुनाथ बांडगी यांची भाषणे झाली.
पदाधिकाऱ्यांचा अल्प परिचय
श्री. अनंत लाड-गेल्या विस वर्षापासून वाचनालयाचे सदस्य असून त्यांनी आजवर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव ही पदे भूषविली आहेत. भरतेश माध्यमिक शाळेतून शिक्षक म्हणून निवृत्त झालेले आणि ज्येष्ठ पत्रकार असलेले अनंत लाड यांनी पन्नास वर्षांपूर्वी मच्छे गावात स्थापन केलेले बाल शिवाजी वाचनालय आजही कार्यरत आहे. याबरोबरच सध्या ते पायोनियर अर्बन बँकेचे संचालक म्हणून कार्य पाहत आहेत. आनंद ऍडवर्टाइझिंग, जायंट्स, जेसीज, घुमटमाळ मारुती मंदिर, बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघ, आधार मल्टीपर्पज सोसायटी, मुक्तांगण विद्यालय अशा विविध संस्थांमध्येही विविध पदावर ते कार्यरत आहेत.
डॉ. विनोद गायकवाड- कादंबऱ्या, नाटके, ललित लेखन अशा विविध क्षेत्रात सुमारे 60 पुस्तकांचे लेखन केलेले डॉ. विनोद गायकवाड हे राणी चन्नम्मा विद्यापीठातून कला शाखेचे डीन म्हणून निवृत्त झाले आहेत. गेल्या पाच वर्षापासून सार्वजनिक वाचनालयाचे सदस्य असून यापूर्वी उपाध्यक्षपद भूषवले आहे. शेकडो व्याख्याने त्यांनी विविध विषयावर दिली असून त्यांच्या साई, युगांत, पृथ्वीपती यासारख्या कादंबऱ्यानी मराठी साहित्यात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
सौ. सुनिता मोहिते यांनी वाचनालयात यापूर्वी अध्यक्ष, सचिव व उपाध्यक्ष ही पदे समर्थपणे भूषवली असून एकल अभियानमध्ये त्या सक्रिय आहेत. आरपीडी महाविद्यालयातील एम ए विषय घेऊन त्या विद्यापीठात प्रथम आलेल्या आहेत. आरपीडीच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकारी आहेत.
अनंत जांगळे हे 2002 पासून वाचनालयात सदस्य असून आत्तापर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष व सहचिटणीस ही पदे भूषवलेली आहेत. हिंदवाडी सोशल क्लबचे संस्थापक सदस्य असलेले जांगळे हिंद हाऊसिंग सोसायटी मध्ये कार्यरत आहेत. तुकाराम बँकेचे विद्यमान संचालक असून जायंट्स फेडरेशनचे राज्य अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे. गेल्या 50 वर्षापासून बेळगावात मराठी नाटके त्यांनी आणली आहेत. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषवले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta