बेळगाव : मराठी विद्यानिकेतनचे वार्षिक स्नेहसंमेलन सुभाष ओऊळकर यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 25 डिसेंबर, 26 डिसेंबर 2024 व 10 जानेवारी2025 रोजी उत्साहात पार पडले. बालवाडी ते इयत्ता दुसरीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.कीर्ती अभय बिर्जे (हुद्दार), तिसरी ते सहावीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक प्रतापसिंह चव्हाण तर सातवी ते दहावीसाठी आय. आर. एस. आकाश चौगुले उपस्थित होते. प्रारंभी स्वागत गीत, प्रास्ताविक, सत्कार समारंभ करण्यात आला. पाहुण्यांची ओळख मुलाखत स्वरूपात घेण्यात आली. यावेळी शाळेचे शिक्षक मंजुषा पाटील, सुनिता पाटील व प्रसाद सावंत हे प्रमुख मुलाखतकार तर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही मुलाखत घेतली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी पालकत्व, अभ्यास व त्याचे महत्त्व, विद्यार्थी व आरोग्य, करिअर संदर्भातील महत्त्वाचे टप्पे सांगून यशस्वी विद्यार्थ्याचे पैलू स्पष्ट केले. गुणवंत विद्यार्थी, विद्यार्थिनींना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या विषयांवर नृत्य, नाट्य सादर केले. यामध्ये मराठी भाषेला मिळालेला अभिजात दर्जा, पर्यावरण संवर्धन, मोबाईलचा वापर, भारतीय सण, पौष्टिक आहार, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी चमत्काराचे प्रयोग अशा वेगवेगळ्या विषयांवर कार्यक्रम सादर करण्यात आले.त्यामध्ये शाहू महाराज व 125व्या साने गुरुजी जयंतीनिमित्त नाट्य स्वरूपात विशेष कार्यक्रम विद्यार्थ्यांनी नीला आपटे यांच्या मार्गदर्शनाने पार पाडला. या कार्यक्रमासाठी रंगमंचावरील सजावट शाळेतील कलाशिक्षक लता नगरे, बाळकृष्ण मनवाडकर यांनी केले. या तिन्ही दिवसांचे सूत्रसंचालन माया पाटील, शिल्पा गर्डे व धीरजसिंह राजपूत यांनी केले. सीमा कंग्राळकर, बी. एम. पाटील व श्वेता सुर्वेकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या शिक्षण संयाजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत, बालवाडी विभाग प्रमुख सीमा कंग्राळकर,शिक्षकवर्ग व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. सांस्कृतिक विभाग प्रमुख शैला पाटील व स्नेहल पोटे उपस्थित होत्या.
Belgaum Varta Belgaum Varta