बेळगाव (प्रतिनिधी) : कॉलेज रोडवरील ठाणे जनता सहकारी बँकेने ५० वर्षांची यशस्वी पूर्ती केली असून ५१ व्या वर्षात दिमाखदार पदार्पण केले आहे. बँकेचा शताब्दीचा महोत्सवही साजरा करावा आणि आम्हालाही बोलवावे. बँकेला आगामी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बँकेच्या शाखेत दि. ५ रोजी हा सोहळा साजरा करण्यात आला. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक भरत देशपांडे, श्रीया देशपांडे, ऍड. विवेक कुलकर्णी, तुकाराम बँकेचे संचालक प्रदीप (दादा) ओऊळकर, अंकिता ओऊळकर आदी उपस्थित होते. शाखा व्यवस्थापक प्रमोद देशपांडे यांनी बँकेच्या आजवरच्या प्रगतीचा धावता आढावा घेतला. बेळगाव शाखेने १०५ कोटीच्या उलाढालीचा टप्पा ओलांडला असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व खातेदार, ठेवीदार, कर्जदार यांनी यापुढेही सहकार्य करावे, असे आवाहन देशपांडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांनी स्वागत स्वीकारून शुभेच्छा दिल्या. बँकेच्या सहाय्यक व्यवस्थापिका सौ. स्वाती सुनील आपटे, बसवराज गच्ची, नागेश कांबळे, सौ. सुजाता माने, राम सांबरेकर, प्रदीप वाके आदींनी सर्वांचे स्वागत केले. सौ. आपटे यांनी आभार मानले. सकाळी सौ. स्वाती आपटे आणि सुनील आपटे यांच्या हस्ते श्रीसत्यनारायण पूजा करण्यात आली. यानंतर संध्याकाळपर्यंत झालेल्या स्वागत समारंभाला अनेक ग्राहकांनी येऊन तीर्थप्रसाद घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta