
येळ्ळूर : इयत्ता पहिली ते पाचवीतील विद्यार्थ्यांसाठी मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यांच्या मजबुतीसाठी शिक्षण महोत्सव (कलिका हब्ब) सर्व सरकारी शाळांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. हा महोत्सव आनंददायी आणि अनुभवाधारित शिक्षण देण्यास मदत करतो. विशेष करून जे विद्यार्थी अभ्यासामध्ये मागासलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा महोत्सव शिक्षणामध्ये आवड निर्माण करण्यास महत्त्वाचा वाटा उचलतो. असे उपक्रम मुलांवरील अभ्यासाचा भार कमी करत असतात. शिक्षण महोत्सव (कलिका हब्ब) म्हणजे मुलानी निर्भयपणे शिकणे, शिकलेले समाजामध्ये प्रदर्शित करणे, आणि इतरांकडून शिकण्यासाठी प्रेरणा घेणे. याच उपक्रमाचे आयोजन येळ्ळूर केंद्रातर्फे सरकारी मराठी उच्च प्राथमिक मॉडेल शाळा येळ्ळूर येथे आज करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या योगा नृत्याने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या मुकुट आणि पुष्प गुच्छाने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य श्री. सतीश बाळकृष्ण पाटील, एस्.डी.एम्.सी. अध्यक्षा श्रीमती रूपा श्रीधर धामणेकर, उपाध्यक्ष श्री. जोतिबा उडकेकर, श्री. मूर्तीकुमार माने, जोतिबा पाटील, चांगदेव मुरकुटे, मारुती येळगुकर, अनिल पाटील, क्षेत्र समन्वय अधिकारी श्री. डॉ. एम्. एस्. मेदार, इ.सी.ओ. वसंत यलबुर्गी, येळ्ळूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. महेश जळगेकर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. चलवादी, येळ्ळूरवाडी शाळेचे मुख्याध्यापक एम्. बी. पाटील, देसूर शाळेचे मुख्याध्यापक श्री. आनंद पाटील तसेच येळ्ळूर केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सहशिक्षक पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी श्री. सतीश पाटील, श्री. महेश जळगेकर, वसंत यलबुर्गी, चंद्रू कोलकार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कलिका हब्ब सात भागांमध्ये पार पडले. स्पष्ट वाचन, कथाकथन, हस्ताक्षर, मेमरी टेस्ट, आनंददायी गणित, प्रश्नमंजुषा, गोष्ट रचणे अशा सात विभागांमध्ये विद्यार्थ्यांचे गुण तपासण्यात आले. प्रत्येक विभागवार, इयत्तावार विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट आणि बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सी.आर.पी. श्री. महेश जळगेकर, सूत्रसंचालन श्री. एस्. बी. पाखरे आणि आभार प्रदर्शन श्रीमती एस्. आर. निलजकर यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta