रणझुझांर शिक्षण संस्थेच्या पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळांचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
बेळगाव : विद्यार्थी जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांमध्ये नैतिक मूल्यांचे अनुष्ठान होणे गरजेचे आहे. त्याकरिता पालकांनी आपल्या पाल्यांचे अति लाड पुरवण्यापेक्षा त्यांच्या लहानात लहान चुकीकडे लक्ष घालने व त्यांना चुकांपासून परावृत्त करण्यासाठी पालकांनी श्यामची आई होणे ही आजच्या काळाची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या युगात शिकत असताना तंत्रज्ञानाचा वापर करून खूप काही गोष्टी शिकता येतात आणि अनुभवही घेता येतो पण शुद्ध आचार विचार, सत्य,त्यागीवृती प्रामाणिकपणा हा चांगल्या सवयीतूनच निर्माण होतो तेव्हा विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी लावून घ्याव्यात. असे विचार नागनाथ हायस्कूल बेकिनकेरी हायस्कूलच्या सहशिक्षिका सौ. सुजाता छत्र पाटील यानी रणझुंझार शिक्षण संस्थेच्या स्नेहसंमेलनामध्ये प्रमुख वक्त्या या नात्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमती विमलताई अशोकराव मोदगेकर होत्या. कार्यक्रमाची सुरुवात रणझुंझार हायस्कूलच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवनाने आणि रणझुंझार विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींच्या स्वागत गीताने झाली. दीपप्रजवलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते तसेच सरस्वती पूजन अध्यक्षांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक कै. अशोकराव नारायणराव मोदगेकर यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे सचिव छत्रू पाटील यांचा हस्ते झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयूर नागेनहट्टी यांनी केले. त्यानंतर रणझुंझार विद्यामंदिरचे मुख्याध्यापक सोमनाथ कुरंगी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सहा शिक्षिका सरिता देसाई यांनी शाळेचे वार्षिक अहवाल वाचन केले. रणझुंझार शिक्षण संस्थेचे सचिव छत्रू यल्लाप्पा पाटील यांनी सरकारचे कोणतेही अनुदान नसताना गेली तीस वर्षे आम्ही ज्ञानदानाचे कार्य करीत आहोत. एकीकडे शिक्षणाचे बाजारीकरण होत असताना आम्ही मात्र फक्त आणि फक्त सेवाभाव वृत्ती ठेवून हे कार्य पुढे नेत आहोत तरी या परिसरातील पालकांनी आपल्या मुलांना नी संकोचपणे शाळेमध्ये पाठवून द्यावेत. शिक्षणाचा दर्जा आणखीन वाढवू.असे सांगितले.
येत्या काही काळात आम्ही अमुलाग्र बदल करणार आहोत. विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबवून उत्तम विद्यार्थी घडवण्याबरोबर आपल्या शाळेला सर्वोत्तम शाळा बनविण्याचा निर्धार अध्यक्षीय भाषणात निखिल मोदगेकर यांनी केला. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरव करण्यात आले. रणझुंझार कॉन्व्हेंट स्कूलचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून श्रीजन सिद्धेश्वर तरळे व निधी नारायण अक्षिमनी तर रणझुंझार विद्यामंदिरचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून समर्थ किरण मोदगेकर, मुलींमध्ये अनन्या महेश अक्षिमनी व खुशी अमर गोमाण्णाचे आणि रणझुंझार हायस्कूलचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून नक्षत्र निंगाप्पा गिरमल व पांडुरंग संजय पाटील यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला रणझुंझार शिक्षण संस्थेचे संचालक विठ्ठल पाटील, सिद्राय वर्पे, अमर मोदगेकर, रमेशराव मोदगेकर, मारुती गाडेकर, वसंत पाटील, लक्ष्मण गोमाणाचे, यल्लाप्पा मोदगेकर, चंदा गाडेकर, पल्लवी पाटील तसेच रणझुंझार हायस्कूलचे मुख्याध्यापक वाय.पी. पावले, इतर शिक्षक, विद्यार्थी, पालक व गावातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नारायण आपटेकर आणि आभार प्रदर्शन काॅन्व्हेंट स्कूलच्या मुख्याध्यापिका सविता अक्षिमनी यांनी केले.