
नागरी हक्क संरक्षण विभागाच्या जिल्हा पोलिस प्रमुखांकडे पालिका कर्माचाऱ्याची लेखी तक्रारीची शक्यता
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या एका कर्मचाऱ्याने दोन नगरसेवकांच्या विरोधात नागरी हक्क संरक्षण विभागाच्या जिल्हा पोलिस प्रमुखांकडे लेखी तक्रार दाखल केली असल्याची शक्यता आहे. या तक्रारीची दखल घेत शहापूर पोलिसांनी दोन्ही नगरसेवकांची चौकशी सुरू केली असल्याची शक्यता दबक्या आवाजात सुरू आहे.
महापालिकेतील सत्ताधारी गटातील दोन नगरसेवकांना १० फेब्रुवारी रोजी अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यामुळे बेळगाव महापालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. आता आणखी दोन नगरसेवकांच्या विरोधात तक्रार झाल्याने महापालिकेत चर्चेचा विषय बनला आहे. नागरी हक्क संरक्षण विभागाकडून त्या तक्रारीची माहिती शहापूर पोलिस ठाण्याला देण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
सदर कर्मचारी आधी महापालिकेच्या महसूल विभागात सेवा बजावत होता. गतवर्षी जानेवारी महिन्यात सदर कर्मचाऱ्याच्या विरोधात एक मोर्चा काढण्यात आला होता. ते प्रकरण मिटविण्यासाठी आपल्याकडे पैशाची मागणी करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद केले असल्याचे बोलले जात आहे. कार्यालयात येवून तसेच फोनवरून पैशाची मागणी करण्यात आली, त्याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत असा दावाही कर्मचाऱ्याने केला आहे. शिवाय या प्रकाराची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर तक्रारही कर्मचाऱ्याने केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta