
बेळगाव : विद्यार्थ्यांनी परीक्षेची भीती न बाळगता आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे, यश नक्की मिळेल. त्यासाठी नियमितपणे सराव करा. चिंतन, मनन करून पूर्ण तयारीनिशी परीक्षेला जा म्हणजे यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन मुख्याध्यापक पी. आर. पाटील यांनी केले.
मच्छे येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित व्ही. एस. पाटील हायस्कूल येथे झालेल्या ‘बाळगोपाळ’ एस एस एल सी व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात आपल्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पी. आर. पाटील हे होते.
प्रारंभी व्ही. एस. पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक ए. बी. पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करून सांगितला; तर मराठी भाषा प्रेरणा मंचचे सदस्य शिवाजी हसनेकर यांनी मान्यवरांना पुष्गुच्छ देऊन स्वागत केले.
मुख्याध्यापक पी. आर. पाटील, मुख्याध्यापक ए. बी. पाटील, शिवाजी हसनेकर व इतरांनी कुंडीतील रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले; तर बाळगोपाळ एस एस एल सी व्याख्यानमालेतील शेवटचे पुष्प गणित या विषयावर पी. आर. पाटील यांनी गुंफले. या व्याख्यानमालेला मच्छे, पिरनवाडी, खादरवाडी, वाघवडे आणि परिसरातील दहावीच्या सुमारे दोनशे विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा उपयोग करून घेतला.
सौ. एस. एन. पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले; तर सौ. एस. टी. पाटील यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta