मुंबई : आयपीएल २०२५ चे वेळापत्रक १६ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आले आहे. चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होत आहे. ही स्पर्धा १३ ठिकाणी खेळवली जाईल. पहिला सामना कोलकाता येथे केकेआर आणि आरसीबी यांच्यात खेळला जाईल. याशिवाय, दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचबरोबर ५ वेळचे विजेते चेन्नई सुपर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना २३ मार्च रोजी खेळला जाईल. दोन्ही संघांचे चाहते प्रचंड आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथे खेळला जाईल. या स्पर्धेत एकूण ७४ सामने खेळवले जातील.
आयपीएलच्या १८ व्या मोसमाला २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमनेसामने असणार आहेत. गतविजेत्या कोलकाता टीमच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात इडन गार्डनमध्ये हा सामना होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी २३ मार्चला या स्पर्धेतील पहिल्या डबल हेडरचं (एकाच दिवशी २ सामने) आयोजन करण्यात आलं आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध राजस्थान आमनेसामने असतील. तर दुसरा सामना हा महामुकाबला असणार आहे. मुंबई विरुद्ध चेन्नई अर्थात रोहित शर्मा विरुद्ध महेंद्रसिंह धोनी असा हा थेट सामना असणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवण्यात येणार आहे. तसेच प्लेऑफ सामन्याचं आयोजन हे २० ते २३ मे दरम्यान करण्यात आलं आहे. तर २५ मे रोजी कोलकातात अंतिम सामना पार पडेल.
६५ दिवस आणि ७४ सामने
यंदाच्या हंगामात एकूण ६५ दिवसांत ७४ सामने खेळवण्यात येणार आहे. मुंबई आणि चेन्नई हे या स्पर्धेतील २ यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी ५-५ वेळा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. हे आयपीएलमधील २ कट्टर प्रतिस्पर्धी या हंगामात एकूण २ वेळा आमनेसामने असणार आहेत. तसेच बंगळुरु-चेन्नई यांच्यातही २ सामने होणार आहेत. यंदा एकूण १३ ठिकाणी हे सामने पार पडणार आहेत. त्यानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगलुरु, हैदराबाद, लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, धर्मशाळा, न्यू चंडीगड, गुवाहाटी आणि विशाखापट्टणम येथे सामने खेळवण्यात येणार आहेत.