
बेळगाव : आज महाराष्ट्र एकीकरण समिती, महाराष्ट्र एकीकरण युवा समिती तसेच महिला आघाडी यांच्या शिष्टमंडळाने भाषिक अल्पसंख्यांक आयोगाचे सहायक आयुक्त शिवकुमार यांची भेट घेऊन सीमाभागातील मराठी भाषिकांवर होणाऱ्या भाषिक गळचेपीबद्दल तक्रारी मांडल्या.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे ही बैठक बोलवण्यात आली होती यावेळी समितीच्या नेत्यांनी मराठी मधून उतारे, सरकारी कागदपत्रे, फलक, बसवरील पाट्या, शाळेत प्रतिभा कारंजी स्पर्धेत होणारे विद्यार्थ्यांवरील अन्याय यासह विविध विषय भाषिक अल्पसंख्यांक आयोगाच्या सहायक आयुक्तांना आणि बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिले.
बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी मराठी भाषिकांच्या भाषिक अधिकारांचे संरक्षण करण्यात येईल, सर्व कागदपत्रे मराठीत पुरविण्यात येतील तसेच भाषिक अल्पसंख्यांकांचे प्रश्न हाताळण्यासाठी ते सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती लवकरच स्थापन करण्याचे आश्वासन दिले. यावेळी भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने सुद्धा सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे यासाठी जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या.

यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, समिती नेते रणजित चव्हाण पाटील, प्रकाश मरगाळे, ॲड . एम.जी. पाटील, रमाकांत कोंडूसकर, आर. एम चौगुले, गोपाळ देसाई, गोपाळ पाटील, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, महिला आघाडी अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, ॲड. अमर येळूरकर, ॲड महेश बिर्जे, मदन बामणे, ॲड.सुधीर चव्हाण, आप्पासाहेब गुरव, माजी महापौर सरिता पाटील, सुधा भातकांडे, श्रीकांत कदम, सुरज कुडूचकर, संतोष कृष्णाचे, आनंद आपटेकर, बी. डी. मोहनगेकर, अनिल पाटील, वासू सामजी, सचिन केळवेकर, राजू कदम, पीयुष हावळ आदी उपस्थित होते. यानंतर अल्पसंख्याकांचे आयुक्त श्री शिवकुमार यांनी चव्हाट गल्लीतील मराठी शाळा नंबर ५, सरदार हायस्कूल, शाळा नंबर १ याठिकाणी भेट दिली.
Belgaum Varta Belgaum Varta