
बेळगाव : खादरवाडी गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण अपूर्ण राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. 2017-18 मध्ये “नम्म ग्राम, नम्म रस्ते” योजनेतून मंजूर झालेल्या या 1.8 किलोमीटर रस्त्याचे काम अद्याप पूर्ण न झाल्याने श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला लेखी निवेदन दिले आहे. सात दिवसांत काम पूर्ण न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
खादरवाडी येथे 2017-18 आर्थिक वर्षात कर्नाटक सरकारच्या “ग्रामीण अभिवृद्धी आणि पंचायत राज” योजनेंतर्गत हा रस्ता मंजूर करण्यात आला होता. मात्र, काम रखडल्याने 2023 मध्ये श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्वखर्चातून रस्त्याची डागडुजी केली. अखेर 2025 साली या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र 10 जानेवारी 2025 रोजी अपूर्ण अवस्थेतच काम थांबवण्यात आले.
गावातील काही राष्ट्रीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी या रस्त्याचे उद्घाटन केले, मात्र त्याचवेळी हा रस्ता पूर्ण करणे गरजेचे होते. ठेकेदाराने संपूर्ण निधी सरकारकडून घेतला असतानाही, अपूर्ण काम का ठेवले? असा सवाल करत श्रीराम सेना हिंदुस्तान आणि शेतकरी संघटनेने प्रशासनाला धारेवर धरले आहे.
यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि रुरल रोड डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या मुख्य अधिकाऱ्यांना लेखी तक्रार देण्यात आली आहे. तसेच, सात दिवसांच्या आत रस्ता पूर्ण न झाल्यास ग्रामस्थनी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta