खानापूर : “दान हे नेहमीच श्रेष्ठ स्थानी असते. मंदिरांना दिली जाणारी देणगी पावित्र्य वाढविणारी असते आणि विद्यालयांनी दिलेली देणगी बौध्दिक विकासाचे महत्त्व वाढविणारी असते!”
आपल्या भारतीय संस्कृतीत दानाला विशेष महत्त्व आहे. दान दिल्याने आपले औदार्य वाढते, याच बरोबर आपल्याला आध्यात्मिक समाधानही मिळते. दान ही एक मानवतेच्या प्रगतीसाठी केलेली निस्वार्थी सेवाच असते.
एकाद्या शैक्षणिक संस्थेचे काम चांगल्या पध्दतीने पुढे जात असेल तर, दान देणारे हजारो हात पुढे सरसावतात असा अनुभव बऱ्याच वेळा आपणास येत असतो.
बेळगावच्या शैक्षणिक वलयात बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक धडे देणारी शिक्षण संस्था म्हणून ‘मराठा मंडळ’ शिक्षण संस्थेचा नावलौकिक आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व शैक्षणिक प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री नागराजू यांनी शिक्षणाचे अनेक आयाम निर्माण केले आहेत. या संस्थेतून शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यात आपल्या उत्तम सेवेचा नमुना पेश करताना दिसतात.
मराठा मंडळ संचलित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात सभागृहाची शोभा वाढविण्यासाठी यळ्ळूरचे युवा उद्योजक श्री अभि देसुरकर व सौ. प्रिया देसुरकर तसेच कॅनरा बँकेचे मॅनेजर श्री. मोहन सर यांनी प्लॅस्टीकच्या दोनशेहून अधिक खुर्च्या भेटी दाखल दिल्या या निमित्त श्री. अभि देसुरकर व सौ. प्रिया देसुरकर तसेच कॅनरा बँकेचे मॅनेजर मान. श्री. मोहन सर यांचे धन्यवाद मानण्यासाठी मराठा मंडळाचे संचालक श्री. शिवाजीराव पाटील व जी एस टी अॅडिशनल कमिशनर श्री. आकाश चौगुले यांच्या हस्ते सत्कार आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना आय टी संयोजिका प्रा.सौ. प्रिया अभि देसूरकर म्हणाल्या “आज समाजामध्ये एकजूट ही भावना अपवादाने पहायला मिळते, संवेदनशील स आनुभूती तर विरळच झाली आहे अशा परिस्थितीत आपण ती वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि हे काम करत असताना स्वतः एक आदर्शवत उदाहरण समाजासमोर असणं गरजेचे आहे. मान, दान आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी जर वाढल्या तर प्रगती सहज होते त्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत!”
यानंतर काॅलेजचे प्राचार्य श्री. अरविंद लक्ष्मणराव पाटील यांनी या दोन्ही देणगीदारांचे आभार मानले, या प्रसंगी ताराराणी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. राहूल जाधव, खानापूर स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई, जनरल सेक्रेटरी संगिता होसूरकर, काॅलेजच्या विद्यार्थ्यांनी, प्राध्यापक वर्ग व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.