बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था व गुरुवर्य वि.गो.साठे मराठी प्रबोधिनी आयोजित शिवचरित्र सामान्य ज्ञान स्पर्धेला पालक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही स्पर्धा मराठी विद्यानिकेतन येथे घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन स्पर्धेला उपस्थित असलेले पालक अमित देसाई, स्वाती ओऊळकर, लक्ष्मी पाटील, डॉ.भरत चौगुले, नंदकुमार किरमाटे, कमल सूर्यवंशी, गायत्री पाटील, विनायक मोदगेकर या पालकांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर, नीला आपटे, बी.बी. शिंदे, इंद्रजीत मोरे, विजय बोंगळे उपस्थित होते. श्री. इंद्रजीत मोरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. श्री. सुभाष ओऊळकर यांनी शिवचरित्र सामान्य ज्ञान स्पर्धेमागील हेतू स्पष्ट केला. सद्यस्थितीत शिवरायांचा खराखुरा इतिहास विद्यार्थी व पालकांना समजावा यासाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी पुस्तकांचे वाचन करावे व यातून पुढच्या पिढीला हा इतिहास योग्य प्रकारे सांगावा असा या स्पर्धेचा हेतू असल्याचे स्पष्ट केले. यानंतर मुलांची व पालकांची सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. स्पर्धेला सीमाभागातील विविध शाळांचे 260 विद्यार्थी व 80 पालक उपस्थित होते. या स्पर्धेतील यशस्वी झालेल्या विद्यार्थी व पालकांचा 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या यशस्वी संयोजनासाठी प्रबोधिनीचे सदस्य मालोजी अष्टेकर, प्रतापसिंह चव्हाण, गजानन सावंत, नारायण उडकेकर, शिवराज चव्हाण, प्रसाद सावंत, सीमा कंग्राळकर, रेणू सुळकर, भारती शिराळे, वरदा देसाई, अश्विनी हलगेकर, सुनीता पाटील, श्वेता सुर्वेकर या सर्वांनी परिश्रम घेतले..
Belgaum Varta Belgaum Varta