बेळगाव : बहुतेक लोकप्रतिनिधी केवळ कोनशिला बसवण्यापुरतेच मर्यादित राहतात, पण महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वतः विकासकामांची गुणवत्ता आणि प्रगती तपासण्यासाठी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेत विविध ठिकाणी सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी केली.
हिंडलगा विजय नगर येथे सध्या श्री गणपती मंदिराचे बांधकाम सुरू असून या कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अचानक भेट दिली. या वेळी त्यांनी मंदिर समितीच्या सदस्यांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधत कामाच्या गुणवत्तेबाबत माहिती घेतली. नुकतीच त्यांनी वाघवडे येथे रस्त्यांच्या कामाची पाहणी केली होती. तेव्हा रस्त्यांच्या मजबुतीकरणासह जलनिचरण व्यवस्था सुरळीत होईल यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर आता हिंडलगा विजय नगर येथील श्री गणपती मंदिराच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करत तिथल्या ग्रामस्थांचे अभिप्राय जाणून घेतले. ग्रामस्थांनी काही तांत्रिक अडचणी आणि आवश्यक सुधारणा याबाबत सूचना दिल्या. त्यावर मंत्री हेब्बाळकर यांनी संबंधित ठेकेदारांना त्वरित सुधारणा करण्याचे निर्देश दिले. तसेच, कोणत्याही परिस्थितीत कामाच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड होऊ नये, अशी सक्त ताकीद दिली. मंत्र्यांनी थेट कामाच्या ठिकाणी येऊन प्रगती तपासल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अनेकदा विकासकामे सुरू झाल्यानंतर लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करतात, मात्र मंत्री हेब्बाळकर यांनी स्वतः लक्ष घालून कामांची पाहणी केल्याने स्थानिक नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.
यावेळी मंदिर समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे प्रतिनिधी, स्थानिक ग्रामस्थ आणि काम करणारे अधिकारी उपस्थित होते.