
बेळगाव : पिरनवाडी येथील सनसेट वॉरियर्स यांच्यातर्फे आयोजित धर्मवीर चषक -2025 भव्य हाफ पीच क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद एस. डी. लायन्स पिरनवाडी संघाला पराभूत करत एस. आर. एस. हिंदुस्थान अनगोळ संघाने पटकावले.
पिरनवाडी येथे सदर क्रिकेट स्पर्धा नुकतीच यशस्वीरित्या पार पडली. स्पर्धेच्या मर्यादित 5 षटकांच्या अंतिम सामन्यात एस. डी. लायन्स पिरनवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करत असताना एस. आर. एस. हिंदुस्थान अनगोळ संघाने 5 षटकामध्ये 2 गडी बाद 61 धावा जमविल्या. या धावांचा पाठलाग करत असताना एस. डी. लायन्स पिरनवाडी संघाला 5 षटकात 5 गडी बाद 36 धावा जमविता आल्या. या पद्धतीने एस.आर.एस. हिंदुस्थान संघाने 25 धावाने सहज विजय मिळवत धर्मवीर चषकावर आपले नांव कोरले.
अंतिम सामन्याचा ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी एस.आर.एस. हिंदुस्थान संघाचा उमेश कुऱ्याळकर हा ठरला. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज म्हणून एस. डी. लायन्स पिरनवाडी संघाचा दस्तगीर याची आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून एस.आर.एस. हिंदुस्थान या संघाचा शाहू यांची निवड करण्यात आली. ‘मालिकावीर’ किताब एस.आर.एस. हिंदुस्थान या संघाचा अमर परमेकर याने हस्तगत केला. अंतिम सामना प्रमुख पाहुणे अक्षय कोलकार, सचिन गोरले, कृष्णा बिंदले, रायनगोळ, गणेश आपटेकर, राहुल धामणेकर व मनोहर बिंदले यांच्या उपस्थितीत पार पडला.
Belgaum Varta Belgaum Varta