बेळगाव : कोबीला मातीमोल दर मिळत असल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडण्यात आले. कोबी पिकाला योग्य हमीभाव द्यावा आणि नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
यावेळी कोबी पिकाला योग्य हमीभाव द्यावा आणि नुकसानीची भरपाई मिळावी, या मागणीचे निवेदन कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
शेतकरी नेते आप्पासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांनी कोबी रस्त्यावर फेकत तीव्र निदर्शने केली. सध्याच्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा देखील मेळ बसत नसल्याने अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत, असे आप्पासाहेब देसाई यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपल्या व्यथा मांडल्या. प्रति एकर 30 ते 40 हजार रुपये खर्च करूनही आज कोबीला फक्त 55-60 रुपये प्रति पोते दर मिळतोय. आम्ही आमच्या श्रमाची किंमत मागतोय. इतक्या कमी दरात मजुरी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह शक्य नाही. सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि कोबी पिकाला योग्य दर द्यावा, असे शेतकऱ्यांनी सांगितले.