
बेळगाव : भगवान श्री महावीर जयंती निमित्त बेळगावात भव्य शोभयात्रा, काढण्यात आली. शोभयात्रेत हजारो अबालवृद्ध सहभागी झाले होते.
शहरातील भगवान महावीर जन्मकल्याण महोत्सव समितीच्यावतीने आयोजित आजच्या शोभायात्रेला धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. शोभायात्रेत शहरातील दिगंबर, श्वेतांबर, मूर्ती पूजक स्थानकवासी (तेरापंथी) जैन समाजातील अबालवृद्ध शेकडोच्या संख्येने सहभागी झाले होते.



यामध्ये रंगीबेरंगी साड्या परिधान करून महिला व युवतींची संख्या लक्षणीय होती. या सर्वांमुळे शोभायात्रेचा मार्ग फुलवून गेला होता. पारंपारिक वाद्यांच्या गजरात निघालेल्या या शोभायात्रेमधील भगवान महावीरांच्या जन्माचा देखाव्यासह त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग दर्शवणारे देखावे असलेले चित्ररथ विशेष करून अग्रभागी असलेले तीर्थंकर भगवान महावीर यांचे मोठे कटआउट आणि त्यासमोरील अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होती.
चित्ररथांसमोर स्त्री -पुरुष, युवक -युवती, झांज पथक, लेझीम पथक वगैरे यामुळे शोभायात्रेदरम्यान नवचैतन्य व जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी युवतींच्या लेझीम पथकाने आपली कला सादर करून उपस्थित आमची दाद मिळविली. या शोभायात्रेचे ठिकठिकाणी उस्फुर्त स्वागत करण्यात येत होते त्याचप्रमाणे शोभा यात्रेच्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या रेखाटण्यात आल्या होत्या. अनेक जैन संस्था आणि युवक मंडळातर्फे शोभायात्रेतील सहभागींना सरबत, ताक आणि लस्सीचे वितरण करून दिलासा देण्यात येत होता. अखेर गोवावेस येथील महावीर भवन येथे शोभायात्रेची सांगता झाली. शोभायात्रेचा आनंद लुटणासाठी ठिकठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी गर्दी केल्याचे पहावयास मिळत होते.
Belgaum Varta Belgaum Varta