
बेळगाव : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे मुख्य सचिव राहुल जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखाली आज राणी चन्नम्मा चौकातून युवक काँग्रेसने आंदोलनात्मक मोर्चा काढला. प्लास्टिकची खेळण्यातील गाडी आणि रिकाम्या सिलिंडरचे प्रदर्शन करून कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा देत आपला रोष व्यक्त केला.

या प्रसंगी काँग्रेसचे मुख्य सचिव राहुल जारकीहोळी म्हणाले की, केंद्र सरकारने घरगुती गॅसच्या दरात केलेली वाढ सामान्य जनतेवर मोठा आर्थिक भार आणणारी आहे. जागतिक बाजारात इंधन दर कमी झाले असतानाही केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले आहेत. भाजपने निवडणुकीत दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत. उलट वेगवेगळे विषय समोर आणून जनतेचे लक्ष विचलित केले जात आहे, असा आरोप त्यांनी केला.
उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ बोलताना म्हणाले, केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ करून जनतेला आर्थिक संकटात ढकललं आहे. दरवाढ आणि अपयश झाकण्यासाठी जनतेला दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. भाजपचं सरकार सामान्य जनतेवर भार टाकत आहे. काँग्रेसने मात्र सत्तेत असो वा नसो, नेहमी जनतेच्या बाजूने उभं राहण्याचं काम केलं आहे. सध्याचं सरकार ‘कर दहशतवाद’ राबवत असून, काँग्रेस इंधन दरवाढ मागे घेतल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, असा इशारा काँग्रेस नेत्यांनी दिला. या आंदोलनातयुवा काँग्रेसचे शहर अध्यक्ष सागर दिवटगी, ग्रामीण अध्यक्ष कार्तिक पाटील, चिक्कोडी जिल्हाध्यक्ष सिद्दिक अन्कलगी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta