बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाचा 13 वा दीक्षांत समारंभ आज बेळगावच्या व्हीटीयू येथील एपीजे अब्दुल कलाम सभागृहात पार पडला. राज्यपाल आणि विद्यापीठाचे कुलगुरू माननीय थावरचंद गेहलोत आणि उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत करण्यात आल्यानंतर मान्यवरांनी समारंभाचे उद्घाटन केले. श्री दुरदुंडेश्वर सिद्धसंस्थान मठ, निडसोशीचे पीठाधिपती श्री निरंजन जगद्गुरु पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांना शेती, शिक्षण आणि समाजसेवेसाठी ‘डॉक्टर ऑफ लेटर्स’ पदवी देऊन सन्मानित करण्यात आले.
कायदा क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तिमत्व आणि संविधान जागृतीसाठी कार्यरत उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एच.एन. नागमोहनदास यांना ‘डॉक्टर ऑफ लॉ’ पदवी, तसेच विजापूर येथील सीकॅब संस्थापक आणि अध्यक्ष शमसुद्दीन अब्दुल्ला पुणेकर यांना शिक्षण, सहकार आणि समाजसेवेसाठी ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवीने सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना राज्यपाल गेहलोत म्हणाले, की आज पदवीधारक विद्यार्थी आपले कौशल्य आणि ज्ञान वापरून विविध आव्हानांना सामोरे जाऊ शकतात. विद्यार्थ्यांनी डिजिटल युगात नवनवीन शिकून काही तरी नवीन निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. शिक्षण हे केवळ ज्ञानापुरते मर्यादित नसून, त्यातून व्यक्तिमत्व विकास, नैतिक मूल्ये आणि समाजसेवा साधता येते. देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी युवकांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी. सुधाकर म्हणाले, की जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या प्रयत्नातून रस्ते बांधकामासाठी 9 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विद्यापीठास मूलभूत सुविधा देऊन शैक्षणिक प्रगती साधावी लागेल. ए.आय. सारख्या तंत्रज्ञानामुळे माणसांचे काम आता यंत्रे करत आहेत. आज पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांनी नवीन शिकून देशासाठी योगदान द्यावे व पालक आणि प्राध्यापकांचे स्वप्न पूर्ण करावे. या दीक्षांत समारंभात एकूण 46013 विद्यार्थ्यांना पदवी तर 2866 विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्रदान करण्यात आली. 11 जणांना सुवर्णपदक आणि रोख बक्षीस, पदवी व पदव्युत्तर पदवी, तसेच 20 जणांना पीएचडी पदव्या देण्यात आल्या.
यावेळी पद्मश्री प्रा. जी.एन. देवी, कुलगुरू सी. एम. त्यागराज, कुलसचिव संतोष कामगौड, रवींद्र कदम, एम.ए. सपना यांच्यासह इतर मान्यवर, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta