Saturday , December 13 2025
Breaking News

बेळगाव विभागीय कृषी सवलती वितरण समारंभ

Spread the love

 

बेळगाव : वन विभागाची परवानगी न मिळाल्यामुळे म्हादई प्रकल्पास विलंब होत आहे. म्हादई , मेकेदाटू, कृष्णा उच्‍च भाग प्रकल्पांतर्गत आलमट्टी जलाशयाची उंची वाढवण्यासह राज्यातील अर्धवट असलेले सर्व सिंचन प्रकल्प तात्काळ सुरू करण्यास राज्य सरकार तयार आहे. केंद्र शासनाने संघराज्य प्रणालीमध्ये मध्यस्थी करत या प्रकल्पांच्या अंमलबजावणीस अनुकूलता निर्माण करावी, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केली.
बेळगाव सुवर्ण विधानसौध प्रांगणात रविवारी (२०) पार पडलेल्या बेळगाव विभागीय कार्यक्रमात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एकूण ४० कोटी रुपये किंमतीच्या एकूण २१५० कृषी सवलती वितरित केल्या.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी म्हादई, मेकेदाटू आणि कृष्णा उच्‍च भाग प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने वन विभागाच्या परवानगीसाठी मध्यस्थी करावी, अशी मागणी केली. या प्रकल्पांची अंमलबजावणी राज्य सरकारला तत्काळ सुरू करायची असून केंद्राकडून अनुकूलता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. कृषीप्रधान देशामध्ये शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. सिंचनावर भर दिला जात असून, बेळगाव विभागात ऊस उत्पादकांची संख्या अधिक असल्यामुळे अत्याधुनिक ऊस कापणी यंत्र देण्यात येत आहे. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज आहे. येत्या काळात अन्नधान्य उत्पादन आणखी वाढावे यासाठी सरकार आवश्यक ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी मंत्री एन. चेलुवरायस्वामी प्रास्ताविकात म्हणाले, हे सहाय्य एक ऐतिहासिक पाऊल आहे. ऊस कापणी यंत्रासाठी अनुसूचित जाती-जमातींसाठी ५० लाख रुपये आणि इतर शेतकऱ्यांसाठी ४० लाख रुपयांपर्यंतची सवलत दिली गेली आहे. यंत्रसामग्री वाटपासाठी यंदा १००० कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, अतिरिक्त ४५ कोटी मुख्यमंत्री निधीतून दिले आहेत. कृषी विभागाला दिलेला निधी योग्य रितीने वापरला जात आहे. कृषी यंत्रसामग्री व श्रीधान्यांना सरकार विशेष प्राधान्य देत आहे. आज वितरित करण्यात आलेल्या यंत्रांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे कृषी मंत्री एन. चेलुवरायस्वामी म्हणाले.

महिला व बालविकास, ज्येष्ठ नागरिक सशक्तीकरण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, सर्वसामान्य जनतेला सुविधा देण्यासाठी राज्य सरकार नेहमीच कटिबद्ध आहे.
‘पंच गॅरंटी’ योजनांच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील प्रत्येक नागरिकाला कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फायदा मिळत आहे. शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर सबसिडी दिली जात असून, हे इतिहासात प्रथमच घडले आहे. सरकारच्या सहाय्यधन योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या यंत्रांचा योग्य वापर करून प्रगती साधावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, नगरविकास मंत्री भैरती सुरेश, सरकारचे मुख्य सचेतक अशोक पट्टण, आमदार राजू (आसिफ) सेठ, बाबासाहेब पाटील, एन. एस. कोनरड्डी, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टिहोळी, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, कृषी विभागाचे आयुक्त वाय. एस. पाटील, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, बेळगाव कृषी विभागाचे सह संचालक शिवनगौडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर, जनप्रतिनिधी, शेतकरी बंधू व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगुंदी येथे शिक्षकाकडून विद्यार्थिनीशी अतिप्रसंग; गावकऱ्यांनी शिक्षकाला चोपले

Spread the love  बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेच्या शिक्षकाने विद्यार्थिनीशी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *