बेळगाव : काँग्रेसच्या मेळाव्यात भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्याने संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी एसीपी नारायण बरमनी यांच्यावर भरसभेतच हात उचलला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या कृतीवरून आता संताप व्यक्त केला जात आहे. त्यांच्या या कृतीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.
बेळगावमध्ये आज काँग्रेसचा मेळावा होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या बोलत असताना अचानक भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. या ठिकाणी एसीपी नारायण बरमनी स्टेज सुरक्षेकरता तैनात होते. महिला कार्यकर्त्यांचा गोंधळ ऐकून सिद्धरामय्या यांचा राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी तत्काळ स्टेजजवळ तैनात असलेल्या एसीपी बरमनी यांना व्यासपीठावर बोलावून घेतले. अन् त्यांच्यावर हात उगारला. सिद्धरामय्या पोलिसांच्या कानशिलात लगावणार होते, पण त्यांनी लगेच आपला हात खाली घेतला. “तू, तू जो कोणी आहेस, इथे ये, तू काय करत होतास?” असे रागाच्या भरात सिद्धरामय्या यांनी विचारले.
या घटनेनंतर, जेडीएसने एक्स वरील पोस्टमध्ये सिद्धरामय्या यांच्यावर अहंकार आणि गैरवर्तनाचा आरोप केला. सार्वजनिक ठिकाणी पोलिस अधिकाऱ्यावर हात उचलल्याबद्दल पक्षाने मुख्यमंत्र्यांवर टीका केली. पोस्टमध्ये या कृत्याचे वर्णन अनादरपूर्ण असल्याचे म्हटले आहे आणि असे म्हटले आहे की अशा प्रकारचे वर्तन, ज्यामध्ये एकेरी शब्दात बोलणे समाविष्ट आहे, ते “अक्षम्य गुन्हा” आहे.
Belgaum Varta Belgaum Varta