Tuesday , December 9 2025
Breaking News

बेळगावात अवतरली अवघी शिवसृष्टी!!

Spread the love

 

बेळगाव : ‘जय शिवराय’चा अखंड गजर, ढोल-ताशांचा ठेका, टाळ-मृदुंगांच्या साथीने सादर होणारे भजन, एकाहून एक सरस देखाव्यांमुळे शिवजयंती चित्ररथ मिरवणूक लक्षवेधी ठरली. प्रत्येक मंडळाने विलक्षण धडपड करून देखावे सादर केले.

नरगुंदकर भावे चौक येथे पारंपरिक पद्धतीने पालखीचे पूजन पोलिस आयुक्त याडा मार्टिन व मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाचे खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या हस्ते झाले.
यावेळी महापौर मंगेश पवार, दक्षिणचे आमदार अभय पाटील, उपमहापौर वाणी जोशी, माजी आमदार अनिल बेनके, माजी महापौर मालोजी अष्टेकर, रणजित चव्हाण-पाटील, मदन बामणे, विकास कलघटगी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका माया कडोलकर, अजित कोकणे, महादेव पाटील, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, गणेश दड्डीकर, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, बाबू कोले, उमेश पाटील, संतोष कृष्णाचे, संजय मोरे, पांडुरंग पट्टन, माजी उपमहापौर सतीश गौरगोंडा, धनराज गवळी, श्रीकांत कदम, अनिल अमरोळे, श्रीधर खन्नूकर, महादेव चौगुले, राजू मरवे, मोरेश बारदेशकर आदी उपस्थित होते.
मिरवणुकीच्या अग्रभागी वडगाव येथील संत ज्ञानेश्वर भजनी होते. त्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’चा जयघोष करीत कार्यकर्ते मार्गस्थ होत होते. मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, धर्मवीर संभाजी महाराज चौक आदी भागातून पालखी काढण्यात आली. ठिकठिकाणी शिवप्रेमी पालखीचे दर्शन घेत होते.

पारंपरिक वाद्यांचा वापर

यावर्षी डीजेला फाटा देत बऱ्याच मंडळांनी चित्ररथ सादर करण्याला प्राधान्य दिले. काही मोजक्याच मंडळांनी डीजे लावल्याचे दिसून आले. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळ व शिवप्रेमींनी केलेल्या आवाहनाला मंडळांनी योग्य प्रकारे प्रतिसाद दिला.

कांगली गल्ली मंडळाने जिंकली मने

एकता युवक मंडळ, कांगली गल्ली या मंडळाने यावर्षी अतिशय सुंदर असा देखावा सादर केला. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण व आजची तरुणाई या विषयावर त्यांनी समर्पक असा सजीव देखावा सादर केला. शिवजयंतीच्या नावावर डीजेचा सुरू असलेला धिंगाणा आणि या दरम्यान होणारे मद्यपान व महिलांची छेडछाड या विषयी त्यांनी देखावा सादर करून शिवाजी महाराज यांची शिकवण काय होती, याची माहिती नाटिकेतून दिली.
रामा मेस्त्री अड्डा येथील बालशिवाजी युवक मंडळाने छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावा सादर केला. मुजावर गल्ली येथील राजेशाही युवक मंडळाने पारंपरिक पद्धतीने बैलजोडीची सजावट करून ती मिरवणुकीत आणली होती. विशेष म्हणजे या बैलजोडीच्या दोऱ्या तरुणीच्या हातात देण्यात आल्या होत्या. काकती येथील लाठीमेळा पथकाने सुंदररीत्या प्रात्यक्षिक सादर केले. शिवनिश्चय लाठीमेळा पथकाने लाठीमेळा, तलवारबाजी यासह इतर प्रात्यक्षिके सादर केली. ताशिलदार गल्ली येथील मंडळाच्या महिलांनी देखावा सादर केला. यावर्षी साडेसातच्या सुमारास सह्याद्रीपुत्र युवक मंडळ, छत्रपती शिवाजी रोड या मंडळाने सर्वप्रथम देखावा सादर केला. त्यापाठोपाठ कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाने देखावे सादर करण्यास सुरुवात केली.

गवळी गल्ली मंडळाचा एकतेचा संदेश

आपला समाज हा जातीपातींमध्ये विभागला गेला असल्याने शत्रू आपल्यावर चाल करतो. त्यामुळे मराठा, लिंगायत, वाणी, ब्राह्मण यासह इतर जातींमध्ये विभागून राहण्यापेक्षा एकत्र या आणि देशाला पुढे घेऊन जा, असा एकतेचा संदेश गवळी गल्ली मंडळाने दिला. लहान बालकांनी हातांमध्ये संदेश देणारे फलक धरले होते. महानगरपालिकेच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी धर्मवीर संभाजी चौक येथे प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था केली होती. परंतु, देखावे सादर करणारी मंडळे लवकर पुढे सरकत नसल्यामुळे प्रेक्षक गॅलरीतील शिवप्रेमी बऱ्याच वेळाच्या प्रतीक्षेनंतर मिरवणूक मार्गाकडे निघाली. यामुळे यावर्षी रात्री एक वाजेपर्यंत प्रेक्षक गॅलरीचा तितकाचा उपयोग झाला नसल्याचे दिसून आले.

ढोलताशा मंडळांचाच आवाज

बेळगावच्या नरवीर ढोलताशा पथक व रणरागिणी ध्वजपथकाने यावर्षीही शेकडोंच्या संख्येने उपस्थित राहून सुंदररीत्या वादन केले. एकाच सुरात शंभरहून अधिक ढोलवादक वादन करीत होते. त्याला झांज आणि ताशांची साथ मिळाली. त्याचबरोबर शंभरहून अधिक ध्वजधारी तरुणी ढोलताशांच्या आवाजावर ध्वज नाचवत होत्या. त्यामुळे हे ढोलताशा वादन पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.

यावर्षीही विस्कळीतपणाचा अनुभव

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीला चांगले वळण लागावे, यासाठी शिवप्रेमींची धडपड सुरू होती. मोठ्या प्रमाणात जागृती झाल्यानंतर यावर्षी चित्ररथ सादर करणाऱ्या मंडळांची संख्या वाढली होती. परंतु, गुरुवारी रात्री मिरवणुकीत ढिसाळ नियोजन दिसून आले. एकामागून एक चित्ररथ पुढे सरकणे गरजेचे होते. परंतु, चित्ररथ पुढे सरकत नसल्याने रामदेव गल्ली, गणपत गल्ली, हुतात्मा चौक या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली. त्यामुळे बऱ्याच वेळा चेंगराचेंगरीही होत होती. अरुंद गल्ल्यांमध्येच देखावे सादर होत असल्याने शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली.

तसेच अनेक सामाजिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांनी शिवप्रेमीसाठी पुलाव, पिण्याचे पाणी व चहाचे वितरण केले. त्यामुळे मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या शिवप्रेमींची चांगली सोय झाली. तसेच मिरवणूक शांततेत पार पाडावी, यासाठी पहाटेपर्यंत पोलिस बंदोबस्त कायम होता.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *