
बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत १ जून १९८६ रोजी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व मराठी भाषिकांनी हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाकडे जमावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
या बैठकीत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी कन्नड सक्तीच्या विरोधात ४० वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “गेल्या ४० वर्षांत नऊ हुतात्म्यांनी कन्नड सक्तीविरोधात हौतात्म्य पत्करले, तरीही कन्नड सक्तीचा जाच आजही कायम आहे.” सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि मराठी भाषिकांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करणे गरजेचे आहे, असे किणेकर यांनी अधोरेखित केले. बैठकीच्या सुरुवातीला प्रकाश राऊत, शास्त्रज्ञ जयंत नारळीकर, माजी महापौर नीलिमा चव्हाण, बंडू आंबेवाडीकर आदींचे निधन झाल्याबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या बैठकीत हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाभोवतीच्या जागेच्या प्रश्नावर चर्चा झाली. याबाबत बोलताना मनोहर किणेकर पुढे म्हणाले, स्मारकाच्या परिसरात अनेक घरांचे बांधकाम झाले आहे, परंतु जिल्हा प्रशासनाकडून जाणीवपूर्वक ही जागा बिगरशेती नसल्याचे सांगत आडमुठे धोरण राबवले जात आहे. “हुतात्मा स्मारक उभारल्यास कर्नाटक सरकारची अब्रू चव्हाट्यावर येईल, या भीतीपोटी प्रशासन असे करत आहे,” असे ते म्हणाले. कन्नड संघटनांनी जरी विरोध केला असला तरी, आता आपण कायदेशीर पद्धतीने आपले म्हणणे मांडू, असे किणेकर यांनी स्पष्ट केले. “कुणाच्याही दबावाखाली येऊन आपल्या लढ्याची दिशा बदलता कामा नये,” केंद्र सरकारने सीमाभाग वादग्रस्त असल्याचे मान्य केले असून, सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. या लढ्यात सर्वांनी एकजुटीने पुढे येऊन १ जून रोजी हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन त्यांनी पुन्हा केले.
Belgaum Varta Belgaum Varta