
बेळगाव : माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद हे बेळगाव जिल्ह्यात जन्माला आले आणि त्यांनी बेळगावची कीर्ती संपूर्ण देशात, दिल्लीपर्यंत पोहोचवली. ते बेळगावचे एक अभिमानास्पद सुपुत्र होते, असे मत माजी राज्यसभा सदस्य आणि के.एल.ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले.
आज बेळगाव जिल्ह्याचे माजी खासदार, दिवंगत बी. शंकरानंद यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बेळगाव शहराच्या क्लब रोडचे नामकरण आणि पुतळा उभारणीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. बी. शंकरानंद यांचे सुपुत्र प्रदीप कणगली यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात बेळगावचे महापौर मंगेश पवार, चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी, उत्तरचे आमदार आसिफ सेठ, दक्षिणचे आमदार अभय पाटील, उपमहापौर वाणी जोशी, माजी खासदार रमेश कट्टी, माजी आमदार फिरोज सेठ, माजी महापौर सविता कांबळे, नगरसेवक संदीप जिरग्याळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत क्लब रोडचे नामकरण ‘बी. शंकरानंद मार्ग’ असे करून नामफलकाचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर, बी. शंकरानंद यांच्या पुतळा उभारणी कामासाठी कोनशिला समारंभ पार पडला.
यावेळी बोलताना माजी राज्यसभा सदस्य आणि के.एल.ई. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे म्हणाले की, माजी केंद्रीय मंत्री बी. शंकरानंद हे बेळगाव जिल्ह्यात जन्मले आणि त्यांनी बेळगावची कीर्ती दिल्लीपर्यंत पोहोचवली. ते एक अभिमानास्पद सुपुत्र होते. शंकरानंद यांचे व्यक्तिमत्व साधे आणि सज्जन होते. त्यांनी कधीही आपल्या पदाचा गैरवापर केला नाही. त्यांनी अनेक योजना बेळगावसाठी आणल्या आणि बेळगावसह देशाला प्रगतीपथावर नेले.
दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सांगितले की, शंकरानंद स्वतः मुख्यमंत्री झाले नाहीत, पण अनेकांना मुख्यमंत्री बनण्याची संधी त्यांनी दिली. त्यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमावेळी रस्त्याचे नामकरण आणि पुतळा उभारणीसाठी आम्ही पक्षभेद विसरून सहकार्य केले. त्यांच्या सक्रिय राजकारणामुळे बेळगावची ओळख दिल्लीपर्यंत पोहोचली. त्यांचे उपकार आजही अनेकांवर आहेत. त्यांचे साधे आणि सज्जन व्यक्तिमत्व सर्वांसाठी आदर्श आहे.
चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या की, दिवंगत बी. शंकरानंद यांचे व्यक्तिमत्व आणि त्यांची ओळख आजही बेळगावच्या खेड्यांपासून दिल्लीपर्यंत ताजी आहे. चिकोडी मतदारसंघाची ओळख आजही दिल्लीत त्यांच्या नावानेच आहेयावेळी कणगली कुटुंबातील सदस्य, विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta