
बेळगाव : “आमचे पाणी आमचा हक्क” घोषणा देत पर्यावरणवाद्यांचा भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. म्हादई नदीचे पाणी वळविण्याचा सरकारचा घाट थांबवावा या प्रमुख मागणीसह सर्वच नद्यांचे रक्षण व्हावे, अशी मागणी भव्य मोर्चाद्वारे पर्यावरणवाद्यांकडून करण्यात आली. विशेष म्हणजे पाणी हक्काच्या मागणीसाठी उद्योजक, शिक्षणतज्ञ, प्राध्यापक, व्यावसायिक यांच्यासह ग्रामीण भागातील असंख्य घटक आणि सर्व स्तरातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले होते.

सरकारला सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खानापूर तालुक्याचा संपूर्ण पश्चिम घाट हा संवेदनशील भागाच्या प्रथम श्रेणीत मोडतो. यासाठी या ठिकाणी निसर्गाला हानी पोहोचविल्यास स्थानिक सूक्ष्म हवामान पर्यावरण पर्जन्यमान यावर दूरगामी प्रतिकूल आणि विनाशकारी परिणाम होणार आहेत. कळसा आणि भांडुरा प्रकल्प राबविल्यास ७०० चौरस कि.मी. भीमगड आणि म्हादई अभयारण्याला धोका पोहोचणार आहे. या प्रदेशातील जल सुरक्षेचा प्रश्न आणखी बिकट होणार आहे. या सर्व आणि त्याहून अधिक कारणांमुळे नेरसा येथे प्रकल्पाचे हाती घेण्यात आलेले काम, तसेच प्रकल्पासाठी लागणारे पाईप आणि इतर साहत्यि निर्मितीचे सुरू झालेले काम, हे सर्व तातडीने थांबविण्यात यावे. कळसा – भांडुरा प्रकल्पाच्या अनुषंगाने असोगा, नेरसा, मनतुर्गा, रुमेवाडी, करंबळ या गावांमधील शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी देण्यात आलेल्या नोटीसी मागे घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींनी मोर्चात सहभाग घेतला होता. या आंदोलकांचे नेतृत्व करणाऱ्यात कॅप्टन नितीन धोंड यांच्यासह दिलीप कामत, नीलिमा कामत, कर्नल सैनी, पर्यावरण प्रेमी शिवाजी कागणीकर, प्राचार्य श्रीकृष्ण प्रभू, रमाकांत कोंडुसकर, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, सुहास किल्लेकर, चंद्रकांत गुंडकल, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, राजेंद्र मुतगेकर, खानापूर समिती अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, गोपाळ पाटील, लता कित्तूर, संजय पोतदार, सुजित मुळगुंद, राजू टोपन्नावर यांचा समावेश होता.
Belgaum Varta Belgaum Varta