
बेळगाव : मिरज माहेर मंडळात जुनच्या मासिक बैठकीत शोभा लोकूर यांच्या सोमवार पेठ निवासस्थानी नुकताच पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. पाहुण्या म्हणून पर्यावरण व बाग प्रेमी दीपा देशपांडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. मंडळात त्यांचे अध्यक्ष अस्मिता आळतेकर व सेक्रेटरी दीपा बापट यांच्या हस्ते रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.
पर्यावरण दिनानिमित्त दीपा देशपांडे यांचे पर्यावरण व बागेची काळजी यावर प्रात्यक्षिक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांनी पर्यावरण संवर्धन व वृक्ष संरक्षण या विषयावर खुपच सुंदर माहिती सांगितली. एका व्यक्तीमागे जवळजवळ अठ्ठावीस झाडे असे प्रमाण असल्यावर पर्यावरण सुरक्षित राहील. आता सध्या असे प्रमाण नाहीच. त्यामुळेच पर्यावरण धोक्यात आहे. खुपच कठिण परिस्थिती आहे. प्रत्येक व्यक्तीने कमीत कमी दोन झाडे लावून ती व्यवस्थित जगवली तरी निसर्ग अबाधित राहील. सर्वांचे आरोग्यही उत्तम राहील, असे त्यांनी सांगितले. रोप कसे लावायचे, त्याची नीगा कशी राखायची, कोणती झाडे आपण घराभोवती लावू शकतो, खत कसे वापरायचे, घरातील ओला कचरा वापरून खत कसे तयार करायचे, गोमुत्रापासुन जीवामृत लिक्विड खत कसे तयार करायचे याचे प्रात्यक्षिक करून दीपा ताईंनी खुपच सुंदर माहिती सांगितली. प्लास्टिकचा वापर टाळा, बाहेर पडताना जवळ कापडी पिशवी नक्की बाळगा. असे केल्यास पर्यावरण हानी रोखण्यास आपला थोडा हातभार लागेल असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांच्या या व्याख्यानाने ज्ञानात भर पडली. समारोपात अस्मिता आळतेकर यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta