
बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये 11जून रोजी साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील शिक्षिका माया पाटील उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते साने गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. साने गुरुजी यांच्या जीवनकार्याचा आढावा देत शिक्षण, स्वातंत्र्याचा लढा, साने गुरुजींचे साहित्य, त्यांची राष्ट्रसेवा देण्याची स्थापना याबद्दल प्रमुख पाहुण्या माया पाटील यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. इयत्ता चौथी ‘अ’मधील विद्यार्थ्यांनी वर्गशिक्षिका स्नेहल पोटे यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम पार पाडला. यामध्ये बाबाजी सावंत याने साने गुरुजींबद्दल माहिती तर तनिष्का पाटील हिने श्यामची आई पुस्तकातील ‘अळणी भाजी ‘ही गोष्ट सांगितली. संगीत शिक्षक सहदेव कांबळे यांच्या सहकार्याने ‘बलसागर भारत होवो, हे गीत चौथी ‘अ’च्या विद्यार्थ्यांनी सादर केले. विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रके तयार केली. याचबरोबर 11 जून याचदिवशी आंतरराष्ट्रीय खेळ दिन असल्याने शाळेतील क्रीडा शिक्षक दत्ता पाटील यांनी खेळांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
शाळेच्या शिक्षण संयोजिका नीला आपटे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक नारायण उडकेकर व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बी. जी. पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख धीरजसिंह राजपूत, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुजा काजोळकर व विहान जाधव या विद्यार्थ्यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta